‘वेस्ट कन्व्हर्टर’ यंत्रणेची उभारणीच नाही

मुंबई महापालिकेच्या मंडयांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावण्यासाठी ‘वेस्ट कन्व्हर्टर’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून एक वर्ष लोटल्यानंतरही ही यंत्रे बसवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मंडयांतील ओल्या कचऱ्याचा प्रश्न कायम आहे.

मुंबई महापालिकेच्या ९२ मंडयांमध्ये दररोज तीन वेळा साफसफाई केली जाते. दररोज ४६ मेट्रिक टन कचरा या मंडयांतून गोळा करण्यात येतो. यामध्ये भाजीपाला, फळे यांचा ओला कचरा अधिक असतो. क्रॉफर्ड मार्केट, दादरची वीर सावरकर मंडई, क्रांतिसिंह नाना पाटील मंडई, मालाडचे साईनाथ मार्केट, भायखळा मार्केट या मंडयांमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची कचराभूमीपर्यंत वाहतूक करण्याऐवजी जागच्या जागी त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार दादरची मीनाताई ठाकरे फूल मंडई, वीर सावरकर मंडई, क्रांतिसिंह नाना पाटील मंडई, मालाडचे साईनाथ मार्केट व भायखळा मार्केट आदी मंडयांमध्ये ‘वेस्ट कन्व्हर्टर’ बसवण्यासाठी निविदा मागवून कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली. याला स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे; परंतु स्थायी समितीने मान्यता देऊन वर्ष होत आले तरी ‘वेस्ट कन्व्हर्टर’चा कुठेही पत्ता नाही.

‘पुढील महिन्यापर्यंत सर्व मंडयांमध्ये ही यंत्रे बसवण्यात येतील,’ अशी माहिती सहायक आयुक्त (बाजार ) डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली. मीनाताई ठाकरे मंडईमध्ये वेस्ट कन्व्हर्टर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी चाचणीचे काम पूर्ण झाल्यावर ते कार्यान्वित केले जाईल. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत वेस्ट कन्व्हर्टर बसवण्याचे काम या महिन्यात पूर्ण होईल. याशिवाय ज्या अन्य मंडई आहेत त्यातही लवकरच वेस्ट कन्व्हर्टर बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करून तेथील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

* मुंबईतील एकूण मंडया : ९२

* दर दिवशी निर्माण होणारा कचरा : ४६ मेट्रिक टन