‘अगं बाई, हा दरवाजा उघडत का नाहीये’, ‘काय मेल्या बायका आहेत आतल्या.. दरवाजा काय बंद करून घ्यायचा’, ‘बाप रे, दरवाजा उघडलाच नाही तर’, असे एक ना अनेक उद्गार मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर ऐकू येत होते. निमित्त होते महिलांच्या पहिल्या दर्जाच्या एका डब्यात स्वयंचलित दरवाजे बसवलेली गाडी प्रवाशांच्या सेवेत पहिल्यांदाच धावण्याचे! पश्चिम रेल्वेने मंगळवारी ही गाडी गर्दीच्या वेळी संध्याकाळी चालवली आणि महिला प्रवाशांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
स्वयंचलित दरवाज्यांच्या या गाडीने सोमवारी ‘ऐन गर्दीच्या’ मुख्य परीक्षेला दांडी मारल्यावर मंगळवारीही ही परीक्षा सकाळच्या वेळेत हुकवली. मात्र संध्याकाळी पाच वाजून २० मिनिटांनी चर्चगेटहून ही गाडी बोरिवलीकडे रवाना झाली, त्या वेळी या एका डब्यात व्यवस्थित गर्दी होती. गाडी स्थानकात थांबल्यानंतर चालत्या गाडीत पटकन चढून जागा पकडण्यासाठी सज्ज असलेल्या महिलांसमोर या डब्याचा बंद दरवाजा आला. अनेक महिलांनी या डब्याचा नाद सोडून देत पुढील डब्याकडे मोर्चा वळवला, तर काही महिला या दरवाज्यापाशी थांबून तो खेचून उघडण्याचा प्रयत्न करत होत्या. डब्यातील महिलाही कधी एकदा दरवाजा उघडतो, या प्रतीक्षेत होत्या. सुदैवाने रेल्वेने या डब्याभोवती आपले कर्मचारी नियुक्त केले होते. त्यामुळे त्यांनी या महिलांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गाडी लोअर परळ स्थानकात आली असता बराच वेळ झाला तरी हा स्वयंचलित दरवाजा उघडतच नव्हता. स्थानकावर स्टेशन अधीक्षक आणि काही कर्मचारी डब्याजवळच थांबले होते. मात्र त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. अखेर काही क्षणानंतर हा दरवाजा उघडला आणि प्रवासी महिला व रेल्वे कर्मचारी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने गाडी प्रत्येक स्थानकावर नियोजित वेळेपुरतीच थांबत असल्याने गाडी वेळापत्रकाप्रमाणेच बोरिवलीला पोहोचली.

सुरक्षेचे काय?
२००६ मध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट झाले होते. त्या वेळी दरवाजे उघडे असल्याने अनेकांना बाहेर पडणे सहज शक्य झाले. असा आणीबाणीचा प्रसंग ओढावल्यास या गाडीत कोंडल्यासारखे वाटेल. परिणामी सुरक्षेसाठी तरतुदी हव्यात
अवि धानोआ (प्रवासी)

रेल्वेला गर्दीच्या वेळेत प्रतिसाद जाणून घ्यायचा असेल, तर त्यांची वेळ चुकली आहे. ही गाडी चर्चगेट येथून सायंकाळी सहाच्या सुमारास सोडायला हवी होती. तसेच ही गाडी विरापर्यंत जलद मार्गावर चालवायला हवी.
अनुप्रिता पाटणकर (प्रवासी)

पावसाळ्यात या दरवाज्यांचा नक्कीच फायदा होईल. मात्र गाडीत घुसमटल्यासारखे वाटू नये, यासाठी वायुविजन व्यवस्था असायला हवी. रेल्वेने हे बदल केल्यास बंद दरवाजांच्या गाडीचे स्वागत आहे.
     – हर्षां गिडवानी (प्रवासी)