मोबाईल आणि इंटरनेट ही आता सर्वांसाठीच महत्त्वाची गरज झाली आहे. सध्या कोणतेही काम करायचे असो त्यासाठी मोबाईल लागतोच. मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकलमध्ये या मोबाईलची रेंज जाते. अनेकांना जास्त काळ प्रवास करायचा असल्याने रेंज गेल्यावर त्यांची कामेही खोळंबतात. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने पुढाकार घेतला आहे. सरकार डिजिटल इंडियाचा नारा देत असताना प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबई उपनगरीय लोकलसह राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये वायफाय सुरू करण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष प्रस्ताव तयार केला आहे. आता हा प्रस्ताव मंजूर होण्याची प्रक्रिया सुरु असून तो झाल्यानंतर लगेचच २ ते ३ महिन्यांत मुंबईकरांना धावत्या लोकलमध्ये वायफाय सुविधा मिळू शकणार आहे. याआधी रेल्वे स्थानकांवर अशाप्रकारे मोफत वायफाय सेवा देण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता पुढे जात धावत्या लोकलमध्ये वायफायची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी खासगी यंत्रणेचा आधार घेण्यात येणार असून त्याबाबतची बोलणी सुरु असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेसोबतच राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्येही ही वायफाय सुविधा सुरु करावी का याबाबत विचार सुरु आहे. या सर्व गोष्टींना मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली जाईल. यासाठी उच्च क्षमतेचा वायफाय राऊटर बसवावा लागणार आहे. रेल्वेत एकावेळी जास्त प्रवासी असतात, त्यामुळे एकावेळी जास्त जणांना रेंज मिळण्यासाठी ही यंत्रणा अधिक कार्यक्षम असणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफाय सेवेचा रोज लाखो प्रवासी लाभ घेत आहेत. गाणी डाऊनलोड करणे, चित्रपट पाहणे तसेच शैक्षणिक साहित्य डाऊनलोड करण्यावर प्रवाशांचा भर आहे. चर्चगेट ते विरार, डहाणू रोडपर्यंत पश्चिम रेल्वेचा विस्तार असून चर्चगेट ते विरार प्रवासासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात. धावत्या लोकलमध्ये वायफाय सुरू झाल्यास रेल्वे स्थानकांपेक्षा लोकलमध्ये या प्रयोगाला सर्वाधिक प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.