डहाणूजवळ मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना या आगीचा फटका बसला असून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. सकाळी साडे आठपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी रात्री उशिरा डहाणू- वाणगाव या स्थानकांदरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागली. डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने ही आग झपाट्याने पसरत गेली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीमुळे ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाल्याने डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा फटका विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या अजूनही खोळंबल्या आहेत. तर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक संथगतीने सुरू आहे. विरार- डहाणू या मार्गावरील उपनगरीय गाड्यांची सेवाही बंद असल्याने भाऊबीजेसाठी निघालेल्या नागरिकांचाही खोळंबा झाला आहे.