काळ आणि वेळ बदलला असून कधीकाळी घरात बसून मुलांचा सांभाळ करणारी स्त्री आता घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. काळानुसार बदलणाऱ्या या महिलेची पश्चिम रेल्वेनेही दखल घेतली असून महिलांच्या डब्यावर दिसणाऱ्या पारंपारिक वेषातील महिलेचा लोगो बदलला जाणार आहे. या लोगोत साडी नेसलेली महिला, डोक्यावर पदर घेतलेल्या स्थितीत दिसायची. पण आता ही जागा मॉडर्न महिलेने घेतली आहे. आता लोगोत ऑफिसला जाणारी शर्ट, पँट घालणारी महिला दिसणार आहे.

लोगोत बदल केला जात असून याशिवाय महिलांसाठी प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, क्रिकेटर मिथाली राज, कल्पना चावला यांची संपूर्ण माहिती डब्याच्या आतमध्ये पहायला मिळणार आहे. आतापर्यंत दोन लोकलमधील डब्यांमध्ये हा बदल करण्यात आला असून काही आठवड्यात उर्वरित पूर्ण केलं जाईल.

दोन महिन्यांपुर्वी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर ए के गुप्ता यांनी पाहणी केली होती. यावेळी त्यांनी लोगोमध्ये बदल केला जावा असं सुचवलं होतं. अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी त्यांनादेखील हा बदल गरजेचं असल्याचं वाटलं होतं.

‘स्वतंत्र आणि यशस्वी महिलांना न्याय देईल तसंच आजच्या काळातील महिला दर्शवेल असा लोगो असावा ही मूळ संकल्पना होती’, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींदर यांनी दिली आहे. लोगो कोणता असावा हे मोठं आव्हान अधिकाऱ्यांसमोर होतं. पुरुषांचा गोंधळ होऊ नये यासाठी लोगो मोठा असावा याकडेही मूळ लक्ष दिलं जात आहे. पश्चिम रेल्वेवरील एकूण ११० डब्यांवर हा नवा लोगो दिसणार आहे.