बोरिवलीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गुरुवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली. रात्री नऊच्या सुमारास बोरिवली येथे अप आणि डाउन धीम्या मार्गावर हा बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यमुळे गोरेगाव ते बोरिवली एवढे अंतर कापण्यासाठीही पाऊण तासापेक्षा जास्त कालावधी लागत होता. परिणामी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

बोरिवली आणि कांदिवली या स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे बोरिवलीच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ा आणि बोरिवलीहून चर्चगेटला जाणाऱ्या गाडय़ा रखडल्या. रात्री साडेदहापर्यंतही हा बिघाड दुरुस्त झाला नसल्याने गाडय़ा तब्बल पाऊण तासापेक्षा जास्त उशिराने धावत होत्या. तसेच या दरम्यान धीम्या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. या बिघाडाबाबत पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.