News Flash

बुलेट ट्रेन कशाला माथी मारताय? अजित पवारांचा सवाल

मुंबई महाराष्ट्राची अस्मिता आहे. आपल्या या अस्मितेला धक्का लावण्याचं काम भाजपाकडून करण्यात आलं असल्याचा आरोपही केला.

महाराष्ट्राची इच्छा नसताना सव्वा लाख कोटी रुपयांची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राला त्याचा काय फायदा आहे? आपण याबाबत पुर्नविचार करतो आहोत. बुलेट ट्रेनचं काम पुढं गेलं तर हा खर्च दीड लाख कोटींपर्यंत होईल, असं सांगितलं जात आहे. हा खर्च महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला.

तसेच, बीकेसीच्या भुखंडावर स्थानक करायचं आहे, म्हणून जागा द्यावी लागत आहे. हे मुंबई महानगरचं नुकसान आहे, त्यामुळं ते आपल्याला परवडणारं नाही. आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर जसं आपल्या विचाराचं सरकार आलं आहे, तशी आपली महानगरपालिका आली पाहिजे. महापालिकेत महाविकासआघाडीचे नगरसेवक निवडूण आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले, मध्यंतरी पाच वर्षे राज्यात भाजापाचं सरकार होतं. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिका ही एक श्रीमंत महापालिका आहे. जवळपास ३५ ते ३८ हजार कोटींचं बजेट मुंबई महापालिकेचं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मात्र, आपल्या या अस्मितेला धक्का लावण्याचं काम मागील पाच वर्षात भाजपाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईतील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

तसेच, जेएनपीटी बंदाराच्या विकासाकडे मागील पाच वर्षात लक्ष देण्यात आलं नाही, येथील व्यापार मोठ्याप्रमाणावर गुजरातला गेला आहे. तुलनेत गुजरातमधील बंदरांचं महत्व वाढवण्याचं काम केंद्रामधील मंत्र्यांनी व राज्यातील भाजापाच्या नेत्यांनी केलं आहे. कंटेनरच्या परवान्याची यंत्रणा देखील गुजरातकडे वळवण्यात आली, ह्युंदाई सारखी कंपनी आज गुजरातमधुन काम करत आहे. त्यामुळे निश्चितपणे येथील व्यापारावर परिणाम झाला आहे. राज्याच्या महसुलावर व उत्पन्नावर परिणाम झाला आहे. येथील युवकांचा रोजगार गेला आहे. येथील उद्योग, व्यापार, व्यवसाय गुजरातकडे वळवण्यात आले आहेत. एअर इंडियाचं मुख्यालय दिल्लीत नेलं आहे. आता एअर इंडियाची इमारत विकायला काढली आहे. याचा विचार आपण करायला हवा, असं देखील त्यांनी सांगितलं.

यावेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे,माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, खासदार माजीद मेमन, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:52 pm

Web Title: what benefit to maharashtra from bullet train ajit pawar msr 87
Next Stories
1 गिरणी कामगारांच्या घराची सोडत, इथे पाहा निकाल
2 ‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार : अजित पवार
3 ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये तासभर चर्चा
Just Now!
X