अमिताभ यांनी नाराजी व्यक्त करताच तक्रारींचा पाऊस; मोबाइल कंपन्यांकडून समस्या दूर करण्याचे आश्वासन 

बिग बी अमिताभ बच्चनने मंगळवारी ट्वीट करून ‘कॉल ड्रॉप’ची व्यथा मांडल्यानंतर ट्विटरवर ‘कॉल ड्रॉप’मुळे हैराण झालेल्यांचा ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे. अवघ्या २४ तासांत दोन हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे ट्वीट ‘शेअर’ करून ही समस्या अधोरेखित केली. अनेकांनी स्वतलाही असाच अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. काहींनी दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांना आपल्या ‘ट्विप्पणी’मध्ये ‘टॅग’ केल्याने या कंपन्यांनाही आपली ‘चुप्पी’ सोडत उत्तर द्यावे लागले. काहींनी ग्राहकांना त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे तसेच आपली एकूणच सेवा सुधारण्याचे आश्वासन ‘ट्विटर’वर दिले. मात्र अनेकांनी या आश्वासनाच्या पूर्ततेबाबत शंका व्यक्त केली.

भ्रमणध्वनी ग्राहक अनेक वर्षांपासून ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येचा सामना करत आहेत. एखाद्याशी फोनवर चर्चा रंगलेली असताना विनाकारण आणि अचानकच फोन बंद झाल्याने होणारी चिडचिड, वैताग अनेकांनी अनुभवला आहे. मोबाइल क्रांतीनंतर या समस्येची वारंवारताही वाढली. महत्त्वाचा फोन मध्येच कट होऊ नये म्हणून पुरेसे नेटवर्क असणाऱ्या ठिकाणी जाण्याकरिता प्रत्येकानेच कधी ना कधी धावपळ केली असेल. लोकलमधून प्रवास करताना फोन मध्येच कट होण्याचा, फोनमधून नीट आवाज न येण्याचा अनुभव तर लाखो मुंबईकर रोज घेत असतात. कित्येकदा केवळ खराब नेटवर्क म्हणत या बाबीचा गांभीर्याने विचार केला जात नाही. मात्र गेल्या २-३ वर्षांपासून भारतातील विविध शहरांतील मोबाइलधारकांकडून कॉल ड्रॉप ही दूरसंचार सेवेतील सर्वात मोठी समस्या असल्याचा पुनरुच्चार केला जात आहे. या मनस्तापाला बच्चन यांनी मंगळवारी जाहीरपणे वाट करून दिली. कॉल ड्रॉपची समस्या ही केवळ विशिष्ट कंपनी अथवा सेवेकरिता मर्यादित नाही.

विविध कंपन्यांच्या इनकमिंग, आऊट गोईंग, लोकल, एसटीडी या सर्वच सेवांवर ग्राहकांनी कॉल ड्रॉपचा अनुभव घेतला आहे. शिक्षणाकरिता मुंबईत राहणारी ईशिता भावे म्हणते, मी घरापासून दूर राहत असल्याने रोजच घरी फोन करते.

गेल्या काही आठवडय़ांपासून अनेकदा मध्येच संपर्क तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. फोनवरचा आवाज व्यवस्थित असतो. नेटवर्कही ठीक असते. मात्र तरीही फोन मधेच ‘कट’ होतो.’ तर विद्यार्थीच असलेला नवजीवन म्हणतो, ‘कॉलेजमधून आम्हाला अनेक गट प्रकल्पांवर काम करायला देतात. प्रकल्पाच्या कामाकरिता आम्ही जेव्हा फोनवर चर्चा करत असतो, तेव्हा मध्येच फोन कट झाल्याने अनेकदा चर्चा फिस्कटली आहे.’

महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत काम करणारी मुक्ता म्हणाली, एका केसच्या संदर्भात मी एका बाईंशी बोलत होते. मात्र आम्ही बोलत असताना दोन वेळा माझा कॉल ड्रॉप झाला. मी जेव्हा तिसऱ्यांदा फोन केला तेव्हा त्या बाई मला म्हणाल्या की मला वाटले होते तुम्हाला बोलण्यात रसच नाही आहे. मी जर फोन केला नसता तर त्या बाईंचा गैरसमज झाला असता. मोबाइल फोन हा कणा असणाऱ्या ई-कॉमर्स सेवांनाही कॉल ड्रॉपचा फटका बसताना दिसतो.

कॉल ड्रॉप म्हणजे काय?

एखाद्याशी मोबाइलवरून बोलताना संभाषण पूर्ण झाल्याशिवाय किंवा दोघांपैकी कोणीही फोन कट केल्याशिवाय फोन मध्येच बंद होणे म्हणजे कॉल ड्रॉप. कॉल ड्रॉपची कारणे मुख्यत्वे तांत्रिक असतात. मोबाइल ट्रान्समिशनचा अभाव हे कॉल ड्रॉपचे प्रमुख कारण मानले जाते. कॉल ड्रॉप्सची एका दिवसातील वारंवारिता हे दूरसंचार कंपन्यांच्या सेवामापनाचे प्रमुख प्रमाण आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या दूरसंचार यंत्रणेचा तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने वापर केला जात आहे. या अतिभारामुळेच कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.    – प्रा. गिरीश कुमार, आयआयटी, मुंबई