राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. भाजप सरकार शिक्षणक्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेच्या प्रसारासाठी करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

नागपूर विद्यापीठाने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांतील अभ्यासक्रमात  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान’, असा विषय समाविष्ट केला आहे. त्याला चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सगळ्यात मोठी विभाजनकारक शक्ती आहे. या संघटनेचा इतिहास हा पूर्णपणे काळा असून तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्यक आहे. ब्रिटिशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाला केलेला विरोध, १९४२चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटिशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतीक आहे, अशी टीका त्यांनी केली.  स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीमध्ये संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंडय़ाला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वत:च्या कार्यालयावर न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे, असे चव्हाण म्हणाले.