व्हॉट्स अॅपवर अश्लिल ग्रुप चालवणाऱ्या अॅडमिनला पोलिसांनी अटक केली आहे. मुश्ताक अली शेख( वय २४) असं अटक केलेल्या अॅडमिनचं नाव आहे. पोलिसांनी त्याला सायन-धारावी परिसरातून अटक केली आहे.
एका महिलेला तिची परवानगी घेतल्याशिवाय या ग्रुपमध्ये अॅड केल्यामुळे या ग्रुप अॅडमिनला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुश्ताक अली शेख हा व्हॉट्स अॅपवर ट्रिपल एक्स नावाच्या एका ग्रुपचा अॅडमीन आहे. या ग्रुपमध्ये काही दिवसांपूर्वी त्याने एका महिलेला तिच्या परवानगीशिवाय अॅड केले. आपल्या मित्रमंडळीपैकी कोणीतरी थट्टा करण्यासाठी आपल्याला अॅड केलं असावं असं तिला सुरूवातीला वाटलं, मात्र त्या ग्रुपवर शेअर झालेले मेसेज पाहून तिला खरा प्रकार लक्षात आला आणि तिने तातडीने माटुंगा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि प्राथमिक चौकशीत ग्रुप अॅडमीनचा क्रमांक पश्चिम बंगालमधील असल्याचं समजलं. अॅडमिनला अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक पश्चिम बंगालला रवाना होण्याच्या तयारीत असतानाच तो क्रमांक सध्या मुंबईतच असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सायन-धारावी परिसरातून अटक केली.
‘चुकून त्या महिलेला अॅड केलं. तो क्रमांक माझ्या नातेवाईकाचा आहे असं मला वाटलं, त्या महिलेला ओळखत नाही’ अशी माहिती त्याने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिली आहे. दरम्यान, आरोपीची रवानगी पोलीस स्थानकात करण्यात आली असून ‘आयटी अॅक्ट 2000’ अंतर्गत त्याला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. संबंधित अॅडमिन पश्चिम बंगालमधील सुतार असून कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 12:31 pm