राज्यात सरकार कोणाचं येणार हे आता राज्यपाल जे काही ठरवतील त्यानंतरच स्पष्ट होईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सत्ता स्थापनेबाबत आज दिवसभरात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संवाद साधला आणि आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले, आज देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र, आता यानंतर राज्यपालांनी घटनेनुसार प्रक्रिया राबवली पाहिजे. यापुढे राज्यपाल काय पाऊल उचलतात हे पहावं लागेल. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आम्ही पवारांशी चर्चा केली. शिवसेना-भाजपाची विचारधारा वेगळी आहे आमची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याबाबत चर्चा करुन काय ते ठरवले जाईल. याबाबत शरद पवारांसोबत सर्वसाधारण चर्चा झाली अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

आज राजीनामा देताना मुख्यमंत्र्यांनी जे काय म्हटलंय त्यावर टिप्पणी करताना चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी केलेल्या महायुतीला अपयश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजीनाम्यातून स्पष्ट सांगितले आहे. आता आपण कितीही फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला तरी आपलं सरकार येणार नाही हे त्यांना कळंलय, हेच त्यातून प्रतित होतंय.

फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात एकही पायाभूत काम केलेलं नाही. ४ वर्षात राज्यात दुष्काळ पडला होता हे सांगत आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेलो नाही हे त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत कबूल केलंय. चार वर्षात राज्यात दुष्काळ होता तर त्यांनी याबाबत ठोस पावले टाकण्याऐवजी बुलेट ट्रेन आणि हायपरपूल करायला निघाले होते, अशा शब्दांत चव्हाण यांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीवर टीकास्त्र सोडले.