निशांत सरवणकर

‘महानगर टेलिफोन निगम’मध्ये (एमटीएनएल) लागू झालेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे मुंबई व दिल्लीतील सुमारे १५ लाखांहून अधिक ग्राहकांसाठी आता फक्त हजारच्या आसपास लाइनमन सेवेत शिल्लक राहिले आहेत. ही संख्या दहा हजार इतकी होती. आधीच सेवेच्या नावाने बोंब असलेल्या ‘एमटीएनएल’चा पार बोजवारा उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईतील काही ग्राहक केंद्रे तात्काळ बंद करण्यात आल्याच्या आरोपाचा व्यवस्थापनाने इन्कार केला आहे.

‘एमटीएनएल’चे मुंबई (सव्वा नऊ लाख) व दिल्लीत (पाच लाख १० हजार) असे सुमारे १४ लाख ग्राहक आहेत. एके काळी लोकप्रिय ठरलेल्या दूरध्वनी ग्राहकांच्या सेवेसाठी आता जेमतेम एक हजार लाइनमन सेवेत आहेत. त्यापैकी ४० टक्के सेवानिवृत्त होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हा फटका अधिक जाणवणार आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये ‘एमटीएनएल’चे ३० लाख ग्राहक होते. सततच्या अस्थिरतेमुळे ती संख्या निम्मी झाल्याचा दावा केला जात आहे. डॉल्फिनची मुंबई व दिल्लीत याच काळात ३४ लाख ग्राहक संख्या होती. ती आता फक्त अडीच लाख इतकी शिल्लक राहिली आहे. बीएसएनएलमध्ये दूरध्वनी व भ्रमणध्वनी अशी एक कोटींच्या आसपास ग्राहकसंख्या असून या सेवेसाठी ४० हजारच्या जवळपास लाइनमन आहेत.

तंत्रज्ञानात निष्णात असणाऱ्या तसेच आठ ते नऊ वर्षे सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली; पण व्यवस्थापनाने त्यांना अडविण्याची तसदी घेतली नाही, अशी खंत युनायटेड फ्रंट या विविध कर्मचारी संघटनांच्या महासंघाचे सरचिटणीस एस. एम. सावंत यांनी व्यक्त केली.

‘एमटीएनएल’ मुंबईचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र गजरे यांनी ग्राहकसेवेचा बोजवारा उडाल्याचा इन्कार केला. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे अचानक झालेली कपात आणि काही विद्यमान कर्मचाऱ्यांची गैरहजेरी यामुळे एकच दिवस ग्राहक केंद्रांना फटका बसला होता. आता सर्व सुरळीत सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. कुठलीही ग्राहक केंद्रे बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

झाले काय?

केंद्र सरकारने अलीकडेच ‘एमटीएनएल’ आणि ‘भारत संचार निगम’मध्ये (बीएसएनएल) स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. ‘एमटीएनएनएल’मधील २४ हजार ३८७, तर ‘बीएसएनएल’मधील ७८ हजार ५६९ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. यापैकी ‘एमटीएनएल’च्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर व जानेवारीचे, तर ‘बीएसएनएल’च्या कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन मिळालेले नाही. वेतनाबाबत अनिश्चितता आहे, तर स्वेच्छानिवृत्तीचे लाभ मिळण्यासही वेळ लागणार आहे. या कर्मचारी कपातीचा फटका आता ग्राहकसेवेलाही बसू लागला आहे.

कर्मचारी स्थिती..

एमटीएनएलमध्ये ५०११ अधिकारी आणि कर्मचारी सेवेत आहेत. यापैकी ११६९ कर्मचारी ५८ ते ६० या वयोगटातील आहेत. बीएसएनएलमध्ये सध्या ७५ हजार २१७ अधिकारी आणि कर्मचारी सेवेत आहेत. यापैकी आठ हजार ४०३ कर्मचारी ५८ ते ६० या वयोगटातील आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत ग्राहकसेवेला फटका बसणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.