आधुनिकतेची कास धरत तंत्रज्ञानाच्या जोडीने प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी ‘बेस्ट’ने ‘वाय-फाय सेवे’चा ‘श्री गणेशा’ केला आहे. सुरुवातीला केवळ दोन बस गाडय़ांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही सेवा यशस्वी झाल्यास, बेस्टच्या ताफ्यातील सर्व बसगाडय़ांत ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. खासगी कंपनीच्या मदतीने ही सेवा प्रवाशांना पुरविली जात असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या बेस्ट ताफ्यात चार हजारांहून अधिक बसगाडय़ा आहेत. यातून रोज सुमारे २८ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत अनेक कारणांमुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली आहे. यात अ‍ॅप आधारित टॅक्सी कंपन्याकडून प्रवासी भाडे कमी आकारले जाण्यासह प्रवाशांच्या मनोरंजनाची सोय केली जात आहे. यामुळे १८ ते ४० वयोगटांतील बहुसंख्य प्रवासी अ‍ॅप आधारित टॅक्सीकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील वाहतूक कोंडीमुळे बेस्ट बसगाडय़ांचा वेग मंदावत असतो. त्यामुळे तरुण वर्ग बेस्ट बसगाडय़ांनी प्रवास करण्यासाठी फार उत्साही नसतो. मात्र येत्या काळात बेस्ट गाडय़ा वेगाने धावोत वा न धावोत, बेस्ट गाडय़ांतील ‘वाय-फाय’ सेवा सुसाट धावली जावी, यासाठी प्रशासनाकडून ‘जलद’ पावले टाकली जात आहे. यासाठी बेस्ट गाडय़ात हायस्पीड वाय-फाय सुविधा सुरू प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.