आठवडय़ाची मुलाखत : निकित सुर्वे (वन्यजीव अभ्यासक)

रविवारी अंधेरीतील शाळेत शिरलेल्या बिबटय़ाच्या घटनेमुळे मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यप्राण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात वावरणाऱ्या बिबटय़ांच्या गणनेचे काम मीरारोड येथे वास्तव्यास असणाऱ्या २५ वर्षीय निकित सुव्रे करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या निकितची वन्य जीव-मानवी संघर्षांबद्दलची मते जाणून घेण्यासाठी त्याच्याशी केलेली ही बातचीत..

*  बिबटय़ांचा गणनेच्या कामाला कशा पद्धतीने सुरुवात झाली?

मुंबई शहर हे बिबटय़ा-मानव संघर्षांवर अभ्यास करण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि परिसरात बिबटय़ा-मानव संघर्षांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात वावरणाऱ्या बिबटय़ांच्या नेमक्या संख्येचा अंदाज घेऊन या हल्ल्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थापनाच्या उद्देशाने बिबटय़ा गणनेच्या कामाला सुरुवात झाली. २०१५ साली पहिल्यांदाच आधुनिक ‘कॅमेरा टॅपिंग’ पद्धतीचा अवलंब करून बिबटय़ांच्या संख्येची मोजणी करण्यात आली. यासाठी येऊ र, मानपाडा, तुळसी, आयआयटी पवई या भागांत वावरणाऱ्या बिबटय़ांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. यामुळे कोणत्या क्षेत्रात किती बिबटे वावरत आहेत, याची कॅमेऱ्याच्या चित्रणासह माहिती समोर आली. या गणनेनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात ३५ बिबटे आढळून आले आहेत.

*  बिबटय़ांच्या गणनेचे काम कसे होते?

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ‘कॅमेरा टॅपिंग’ पद्धतीने त्या-त्या क्षेत्रात वावरणाऱ्या बिबटय़ांचे चित्रण केले जाते. यासाठी वन्यजीव स्वयंसेवकांच्या मदतीने राष्ट्रीय उद्यान आणि परिसरातील जंगलामधून जाणाऱ्या पायवाटा पिंजून काढल्या जातात. ज्या भागातील झाडाच्या खोडावर बिबटय़ाच्या नखांचे ओरखडे, त्याची विष्ठा आणि पायांचे ठसे मोठय़ा प्रमाणात आढळतील त्या भागात कॅमेरे लावण्यात येतात. कॅमेरा लावतानादेखील एकाच ठिकाणी समोरासमोर दोन कॅमेरे बसविले जातात. कारण प्रत्येक बिबटय़ाच्या अंगावर असणारे ठिपके हे वेगवेगळे असतात. शिवाय बिबटय़ाच्या उजव्या आणि डाव्या अंगावरील ठिपक्यांमध्येही विविधता असते. त्यामुळे या ठिपक्यांच्या आधारे प्रत्येक बिबटय़ाची नोंद केली जाते. तसेच नर आणि मादी यांची संख्या समजण्यासाठीदेखील ‘कॅमेरा टॅपिंग’ पद्धत फायदेशीर ठरते. याशिवाय प्रत्येक ठिकाणी जाऊन कॅमेऱ्याचे चित्रण तपासले जाते. त्यामध्ये चित्रित झालेल्या बिबटय़ाची नोंद केली जाते. त्यानंतर बिबटय़ांच्या अंगावरील ठिपक्यांच्या आधारे चित्रित झालेला प्रत्येक बिबटय़ा वेगळा आहे का, याचे निरीक्षण नोंदविले जाते.

*  सद्य:स्थितीत राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांचा गणनेची काय स्थिती आहे?

२०१५ नंतर यंदाच्या वर्षी नव्याने बिबटय़ांची गणना केली असून येत्या आठवडय़ात याचा अहवाल प्रकाशित होणार आहे. या मोजणीसाठी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील ४० ते ५० ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी दोन कॅमेरे लावणे गरजेचे असल्याने साधारण ८० ते १०० कॅमेऱ्यांतून प्राप्त झालेल्या चित्रणाच्या मदतीने यंदाची गणना पार पडली आहे. राष्ट्रीय उद्यानाचा आवाका मोठा असल्याने लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे व्यवस्थापन आणि देखरेखीचे काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे या कामासाठी विभागानुसार स्वयंसेवकांची मदत घेतली जाते. मुंबईतील विविध महाविद्यालयांत प्राणिशास्त्र विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्राणिप्रेमी कार्यकर्ते मिळून सुमारे ५० ते ६० स्वयंसेवक या प्रकल्पात काम करतात. मानपाडा आणि बोरिवली या दोन भागांत स्वयंसेवक कार्यरत असतात. शिवाय वनविभागातील अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांचे देखील मोठे सहकार्य या कामासाठी मिळते.

*  गणनेच्या कामातील आव्हाने कोणती आहेत?

गणनेच्या कामात निर्माण होणारे सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र. आरे वसाहतीपासून उत्तरेच्या दिशेने असलेला वसई खाडीचा परिसर. त्यानंतर ठाण्याकडील येऊर जंगलाचा परिसर राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येतो. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा परिसरात वावरणाऱ्या बिबटय़ांचा शोध घेऊन त्यांची आकडेवारी प्रसिद्ध करणे आव्हानात्मक आहे. शिवाय तांत्रिक बाबींचा विचार केला असता, कॅमेऱ्यात चित्रित झालेला प्रत्येक बिबटय़ाचे निरीक्षण करून तो इतर बिबटय़ांपेक्षा वेगळा असल्याची नोंद काळजीपूर्वक करावी लागतात.

*  मानवी वस्तीत येणाऱ्या बिबटय़ाच्या नियोजनासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे?

मुंबईसारख्या मोठय़ा शहरात सुमारे ३५ बिबटय़ांचा मुक्त वावर असणे ही वन्यजीव क्षेत्रात मोठी गोष्ट आहे. रविवारी अंधेरीतील शाळेत शिरलेल्या बिबटय़ाबाबत सामान्य माणसांकडून आश्चर्य व्यक्त  केले जात आहे. तसेच इतक्या भरवस्तीतही बिबटय़ाचा वावर कसा आढळतो, यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. मात्र कुत्रे-मांजर अशा सहज प्राप्त होणाऱ्या खाद्यासाठी मानवी वस्तीत बिबटय़ा शिरतो याची ही काही पहिलीच घटना नाही. तसेच संरक्षण भिंत उभारूनदेखील बिबटय़ा त्यावरून सहजरीत्या उडी मारू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या भोवती असणाऱ्या रहिवाशी वसाहतींमध्ये जनजागृती करून बिबटय़ा दिसल्यास त्याच्या नियोजनासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याचे त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. बिबटय़ासारख्या वन्यजीवांच्या रक्षणाकरिता मुंबईकरांनी जागृती असणे आवश्यक आहे.

मुलाखत – अक्षय मांडवकर 

akshay.mandavkar@expressindia.com