‘कालनिर्णयकार’ ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. इच्छापत्रावरून वाद होतात. त्यामुळे आपल्या वडिलांनी मृत्युपत्र लिहून ठेवणे शक्य नाही, हे मृत्युपत्र बनावट असल्याचा दावा करीत साळगावकर यांचे द्वितीय पुत्र जयानंद यांनी मृत्युपत्राला आव्हान दिले आहे. तसेच प्रशासक नेमून साळगावकरांच्या मालमत्तेचे समान वाटप करावे आणि आपला दावा निकाली निघेपर्यंत ही मालमत्ता विकण्यास जयराज आणि जयेंद्र यांना मज्जाव करावा, अशी मागणीही जयानंद यांनी केली आहे.
साळगावकरांनी मृत्यूच्या दोन वर्षे आधी म्हणजेच २७ जून २०११ रोजी मृत्युपत्र लिहिले होते. २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोठा मुलगा जयराज आणि धाकटा मुलगा जयेंद्र यांनी मृत्युपत्राच्या ‘प्रोबेट’साठी जानेवारी २०१४ मध्ये न्यायालयात अर्ज केला. त्यावर हे मृत्युपत्र आपल्या वडिलांनी लिहिलेलेच नाही, असा दावा करीत जयानंद यांनी त्यास आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे जयानंद यांनी आई, भावांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांनाही प्रतिवादी केले आहे. त्यामुळे जयराज आणि जयेंद्र यांनी केलेल्या ‘प्रोबेट’चा व जयानंद यांचा त्याला विरोध करणारा असे दोन्ही दावे एकत्रित चालण्याची शक्यता आहे.  जयानंद यांनी दिवाणी न्यायालयातही ‘लक्ष्मीसदन’ या साळगावकरांच्या दादर येथील निवासी इमारतीबाबत दावा केला आहे. त्यात त्यांनी या इमारतीसंदर्भात कुठलीही परवानगी देण्याबाबत पालिकेला मज्जाव करण्याची विनंती केली आहे. साळगावकर आणि जयानंद यांच्यात ते हयात असतानाच वितुष्ट आले होते. स्वत: साळगावकरांनी जयानंदविरोधात फौजदारी तक्रारी केलेल्या आहेत. साळगावकरांनी आपल्या मृत्युपत्रात जंगम मालमत्तेचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी आपल्या नावावरील जंगम मालमत्तेचा हयातीतच विनियोग केला होता. त्यांच्या व त्यांच्या दोन मुलांच्या नावे ‘कालनिर्णय’शी संबंधित विविध कंपन्या आहेत. शिवाय मालवणात कांदळगाव येथे जवळपास १०० एकर जागा आहे.
 ‘लक्ष्मीसदन’ इमारत मुलांना दिलेली आहे. नातींच्या नावेही काही मालमत्ता केली आहे. पत्नीच्या चरितार्थाच्या व्यवस्थेबाबतही त्यांनी मृत्युपत्रात नमूद केले आहे. साळगावकरांच्या मृत्युपत्राबाबत दाखल या दाव्यांची सुनावणी न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्यासमोर होणार आहे. गुरुवारी हे प्रकरण सुनावणीसाठी येऊ शकले नाही. जयराज, जयेंद्र आणि अन्य कुटुंबीयांसाठी अ‍ॅड्. राजेंद्र पै, बीना पै आणि प्रशांत करंडे बाजू मांडणार आहेत.
मृत्युपत्रातील मुद्दे
*माझ्या व मुलांच्या नावे ‘कालनिर्णय’शी संबंधित विविध कंपन्या, जमीन आणि अन्य मालमत्ता अशी कोटय़वधींची मालमत्ता आहे. या मालमत्तेत जो व्यक्तिगत वाटा मिळणार आहे. त्या निधीतून ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर निधी स्थापन करण्यात यावा. या निधीतून संतवाङ्मय प्रकाशित करावे. विशेषत: अप्रकाशित संतवाङ्मयावर भर द्यावा. ३५० संतकवीपैकी ३०-४० संतांच्या रचनाच प्रकाशित झाल्या आहेत. प्राथमिक ग्रंथालयांना याची एक प्रत विनामूल्य द्यावी. निधीच्या उत्पन्नातील १० टक्के रक्कम दरवर्षी मालवणच्या जयगणेश मंदिराला देण्यात यावी. आपण ज्या विविध मूर्ती, रुद्राक्ष तसेच दुर्मीळ वस्तू संग्रहित केलेल्या आहेत त्या विकू नयेत. जर आपले वारस आपल्या या वस्तूंचे जतन करण्यास असमर्थ ठरले तर योग्य व लायक देवभक्त व्यक्तींना त्या भेट म्हणून द्याव्यात. ओढगस्तीच्या काळात पोटाला चिमटा काढून ग्रंथ-पुस्तके विकत घेतली होती. माझ्याकडे उत्तम ग्रंथसंग्रहालय आहे. तो मुंबई ग्रंथसंग्रहालयात ठेवावा आणि त्यातील धर्मकोश हे उपयोगी येतील अशा ठिकाणी ठेवावीत. विशेषत: जयगणेशमंदिर .
*परिस्थितीशी झुंजत होतो. तेव्हा ईश्वराकडे प्रार्थना केली होती की या परिस्थितीतून बाहेर काढ. आयुष्यात जे मिळेल ते तुझ्या चरणी अर्पण करेन. म्हणून मालमत्तेतील व्यक्तिगत वाटय़ातील निधीतील काही वाटा जयगणेश मंदिरासाठी द्यावा.

 

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच