राज्यातील पवनऊर्जा कंपन्यांना फायदेशीर धोरण राबवण्याची परंपरा राज्य वीज नियामक आयोगाने यंदा अपारंपरिक ऊर्जेचे दर ठरवतानाही कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातील पवनऊर्जेसाठी देण्यात आलेला प्रति युनिट पाच रुपये ८१ पैशांचा दर हा कर्नाटक, गुजरात, आंध प्रदेश, मध्य प्रदेशमधील पवनऊर्जेच्या दरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या राज्यांतील वीजग्राहकांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजग्राहकांना पवनऊर्जेपोटी प्रति युनिट किमान एक रुपया १० पैसे जास्त मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्रात आजमितीस २९५४ मेगावॉट क्षमतेच्या पवनचक्क्या आहेत. महाराष्ट्रात पवनऊर्जा कंपन्यांना अनेक आर्थिक सवलती असून प्रति मेगावॉट पवनचक्की उभारणीचा खर्चही कमी आहे. तरीही राज्य वीज नियामक आयोगाने वेळोवेळी पवनऊर्जा कंपन्यांना फायद्याचे धोरण राबवल्याची उदाहरणे सतत समोर येत राहतात. यंदा २०१३-१४ वर्षांसाठी राज्यात अपारंपरिक वीजखरेदीचे दर ठरवतानाही तीच परंपरा कायम राहिली आहे, त्यामुळे पवनऊर्जा कंपन्यांची चंगळ, तर वाढीव दराचा बोजा सामान्य ग्राहकांवर असे चित्र आहे. महाराष्ट्रात पवनचक्की उभारणीसाठी प्रति मेगावॉट पाच कोटी ३९ लाख रुपये खर्च येतो, तर विजेचा दर पाच रुपये ८१ पैसे ठेवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमध्ये पवनचक्की उभारणीसाठी प्रति मेगावॉट पाच कोटी ७५ लाख रुपये खर्च आहे व तो महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे, तरीही तेथील पवनऊर्जेचा दर प्रति युनिट चार रुपये ७० पैसे आहे. कर्नाटकात पवनचक्की उभारणीचा खर्च प्रति मेगावॉट चार कोटी ७० लाख रुपये असून दर प्रति युनिट तीन रुपये ७० पैसे आहे. मध्य प्रदेशात पवनचक्की उभारणीचा प्रति मेगावॉट खर्च पाच कोटी रुपये असून दर चार रुपये ३५ पैसे प्रति युनिट आहे. तामिळनाडू हे पवनऊर्जेत देशातील आघाडीचे राज्य म्हणून गणले जाते. तेथे पवनचक्की उभारणीचा दर प्रति मेगावॉट पाच कोटी ७५ लाख रुपये आहे, दर मात्र तीन रुपये ५१ पैसे प्रति युनिट आहे. म्हणजेच महाराष्ट्रात पवनचक्की उभारणीचा खर्च तुलनेत कमी असतानाही पवनऊर्जेचा दर मात्र शेजारच्या राज्यांपेक्षा एक ते दीड रुपये प्रति युनिट अधिक आहे. या धोरणाचा लाभ साहजिकच पवनऊर्जा कंपन्यांना मिळत आहे. कमी गुंतवणुकीत जास्त दराच्या रूपाने अतिरिक्त नफा मिळवण्याची संधी त्यांना मिळत आहे. अपारंपरिक ऊर्जा खरेदी करणे सर्वच वीज वितरण कंपन्यांना सक्तीचे असते. त्यामुळे पवनऊर्जेच्या अतिरिक्त दरामुळे वीज कंपन्यांचा पवनऊर्जा खरेदीवरील खर्च वाढतो. साहजिकच त्याचा बोजा वीजदरवाढीवेळी सामान्य ग्राहकांवर पडत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जेप्रमाणेच पवनचक्क्यांची कार्यक्षमताही वाढली आहे. म्हणजेच त्यातून निर्माण होणारी वीजनिर्मितीही वाढली आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत वीजदरात कपात होऊन याचा लाभ ग्राहकांना मिळत आहे. पण तेच तत्त्व लागू असतानाही वीज आयोगाने पवनचक्क्यांच्या बाबतीत दरवाढीचे धोरण कायम ठेवले आहे हे विशेष