घाटकोपर स्थानकावरील तीन क्रमांकाच्या फलाटावर नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेची मंगळवारी दुपारी प्रसूती झाली. घाटकोपर स्थानकावरील १ रुपयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या चिकित्सालयातील डॉक्टर स्थानकावर वेळेत उपस्थित राहिल्याने या महिलेची प्रसूती सुखरूप झाली.

टिटवाळा येथे राहणारी गुडिया खान (२८) ही नऊ महिन्याची गर्भवती महिला टिटवाळ्याहून दादरला जात होती. तिचा पती मोहम्मद खानही तिच्या सोबत होता. विक्रोळी स्थानक सोडल्यानंतर गुडिया खानला प्रसूतीकळा सुरू झाल्या. लोकल डब्यातील एका व्यक्तीने घाटकोपरच्या स्थानक मास्तरांना ही माहिती दिली. त्यामुळे स्थानक मास्तरांनी तात्काळ जवळच असलेल्या चिकित्सालयाशी संपर्क साधला.

तेथील डॉ. राहुल घुले यांनी फलाटावर धाव घेतली. लोकल घाटकोपर स्थानकावर आल्यावर तिला खाली उतरवले आणि स्थानकावरच गुडियाने बालिकेला जन्म दिला. ते अडीच किलोचे आहे. गुडियाचा पती आणि स्थानकावरील प्रवाशांनी डॉक्टरांचे आभार मानले. त्यांनी गुडियाला तातडीने स्थानकाजवळील चिकित्सालयात आणून बाळ आणि बाळाच्या आईचा श्वासोच्छवास आणि रक्तदाब तपासण्यात आला. त्यानंतर दोघांना राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. एक रुपयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या चिकित्सालयांमुळे प्रवाशांना मोठा  आधार मिळाल्याचे सांगण्यात आले.