एसटीच्या चंद्रपूर आगारात प्रमुख कारागीर असलेल्या एका अधिकाऱ्याने हाताखालच्या स्वच्छक पदावरील महिलेकडे अनेकदा शरीरसुखाची मागणी केली असून अनेकदा लैंगिक शोषणही केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या तक्रारीची दखल घेत महिला तक्रार निवारण समितीला या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पीडित महिला आपल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर एसटीच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी प्रशासनाच्या सेवेत आई – बहिणीप्रमाणे वागणूक मिळेल, असे आपल्याला रुजू होण्यापूर्वी वाटत होते. मात्र काही काळातच प्रमुख कारागीर मधुकर नवघरे यांनी आपले शोषण सुरू केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. नवघरे कामावर मद्यपान करून येतात व मानसिक तसेच शारीरिक त्रास देतात. ‘मी तुमचा वरिष्ठ अधिकारी आहे. तुमची तक्रार करून तुम्हाला कधीही कामावरून काढून टाकू शकतो,’ अशा धमक्याही त्याने दिल्याचे या महिलेने म्हटले आहे.
या आगारातील इतर तीन महिलांनीही स्वाक्षऱ्या करून या महिलेच्या तक्रारीला पाठिंबा दिला आहे. या तक्रारीची प्रत चंद्रपूर विभागाचे विभागीय संचालक यांच्यासह राज्य एसटी कामगार संघटनेच्या मुंबई कार्यालयातही पाठवण्यात आली. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी ही बाब त्वरीत व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्या कानावर घातली. कपूर यांनीही या तक्रारीची दखल घेत चंद्रपूर विभागातील महिला तक्रार निवारण समितीला या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितले आहे. या समितीने आपला अहवाल १६ ऑगस्टपर्यंत पाठवून द्यावा, असे आदेशही कपूर यांनी दिले आहेत.

हा प्रकार लाजिरवाणाच
(शिवाजीराव चव्हाण, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना)
एसटीतीलच नाही, तर कोणत्याही सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची वागणूक मिळणे हे लांच्छनास्पद आहे. एसटीमध्ये याआधीही एका मोठय़ा अधिकाऱ्यावर असे आरोप झाले होते. मात्र तो अधिकारी निवृत्त होऊन आरामात निवृत्तीवेतनाचा लाभ घेत आहे. या प्रकरणात तरी प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी़

दूरगामी उपायांची गरज
(दीपक कपूर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)
एसटीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी अशा घटनांचा विचार होणे आवश्यक होते. मात्र अशा घटनांना आळा घालण्यासाठी दूरगामी उपायांची गरज आहे. त्यासाठी सर्व विभागांतील महिला तक्रार निवारण समित्यांची बैठक घेण्यात येईल. चंद्रपूरप्रकरणी अहवाल आल्यावर योग्य कारवाई केली जाईल.