‘मेट्रो २ए’, ‘मेट्रो ७’ची चाचणी १४ जानेवारीस; मे २०२१पर्यंत दोन्ही मार्गिका कार्यरत

मुंबई : करोनामुळे प्रकल्पपूर्ती लांबलेल्या मेट्रो २ए (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या दोन मार्गिकांच्या कामांस वेग आला असून, पुढील वर्षी १४ जानेवारीला पहिल्या मेट्रो रेल्वेगाडीची चाचणी होईल. तर मे २०२१पर्यंत या दोन्ही मार्गिका कार्यरत होतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

भविष्यात ‘एमएमआरडीए’मार्फत मुंबई आणि महानगर परिसरात १४ मार्गिकांद्वारे सुमारे ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यापैकी ३५.१ किमीच्या एकूण दोन मेट्रो मार्गिका डिसेंबर २०२० मध्ये कार्यरत करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र करोना, टाळेबंदी, मजुरांची कमतरता अशा अनेक कारणाने ही उद्दिष्टपूर्ती लांबली.

सध्या मेट्रो मार्गिकांवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या करोनापूर्व काळाच्या जवळपास पोहचली असून या दोन्ही मार्गिकांवरील मजुरांची संख्या वाढविण्यात येत असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. यावर्षी ऑगस्टमध्ये मेट्रोची पहिली रेल्वेगाडी येणे अपेक्षित होते. ती आता डिसेंबरमध्ये चारकोप डेपोत दाखल होईल. त्यानंतर १४ जानेवारी २०२१ ला पहिली चाचणी घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. या दोन्ही मार्गिकांचे स्थापत्य काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल. मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या मार्गिकांवर प्रत्येक विभागाचे काम समांतरपणे सुरू ठेवण्यावर भर असेल, असे राजीव यांनी सांगितले.

एमएमआरडीएतर्फे चार मार्गिकांसाठी एकूण ५०४ मेट्रो डबे बांधणीचे कंत्राट ‘भारत अर्थ मूव्हर्स लि.’ला देण्यात आले आहे. मेट्रो स्थानकातून व्यावसायिक तसेच निवासी संकुलांना थेट जोडणीचे धोरण एमएमआरडीएने यावर्षी मंजूर केले होते. त्यानुसार मेट्रो ७ मार्गिकेवर पोयसर आणि आरे स्थानकासाठी प्रस्ताव आले असून त्यास मंजुरी देण्यात आल्याचे एमएमआरडीएने सांगितले.

मेट्रो ७ मार्गिकेसाठी दहिसर येथील जागा अद्याप प्राधिकरणाच्या ताब्यात आलेली नसल्याने सध्या दोन्ही मार्गिकांसाठी चारकोप येथील डेपोचा सामाईक वापर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मजूर परतले

टाळेबंदीत गावी गेलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. विशेष रेल्वे गाड्या, विशेष बोगी अशा माध्यमातून हे मजूर परत आणले जात असून काही परतीच्या वाटेवर आहेत. करोनापूर्व काळात एकूण मेट्रो मार्गिकांच्या कामावर १६ मार्चला सात हजार १०९ मजूर कामावर होते, तर सध्या सरासरी सहा हजार ३३२ मजूर कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील मजुरांसाठी विशेष भरती जाहिराताला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केवळ शे-दोनशेच मजूर राज्यातून मिळल्याचे त्यांनी सांगितले.

‘एमएमआरडीए’ला ६ ते ८ हजार कोटी?

या दोन्ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर प्रवासी भाडे आणि त्याव्यतिरिक्त स्रोतातून ३० वर्षांच्या महसुलापोटी गुंतवणुकीस कॅ नडा पेन्शन प्लान इन्व्हेस्टमेन्ट बोर्डाने स्वारस्य दाखवले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही योजना मसुदा स्वरूपात चर्चेत होते. दोन्ही मार्गांच्या एकू ण खर्चापैकी निम्म्याहून अधिक रक्कम सहा ते आठ हजार कोटी रुपये ‘एमएमआरडीए’स मिळू शकतील. मात्र प्रकल्पपूर्ती लांबणीवर गेल्याने त्यावर निर्णय झाला नव्हता. पण त्यादृष्टीने एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू असल्याचे राजीव यांनी यावेळी नमूद के ले.

मेट्रो कशी असेल?

’  प्रत्येक मेट्रो रेल्वेगाडीस सहा डबे असतील.

’ पहिली रेल्वेगाडी डिसेंबरमध्ये दाखल होईल. तर पुढील प्रत्येक महिन्यात दोन गाड्या येतील.

’ एप्रिल अखेर दहा गाड्या मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकांसाठी ताफ्यात असतील.

’ सुरुवातीस दोन्ही मार्गावर प्रत्येकी पाच मेट्रो गाड्या, २० ते २५ मिनिटांच्या वारंवारितेसह धावतील.

’  त्यानंतर प्रत्येक महिन्यात दोन रेल्वेगाड्यांची भर यामध्ये पडेल.

 

२०१६ च्या भाडेनिश्चितीनुसार मेट्रोचे भाडे

  • ० ते ३ किमी- १० रुपये
  • ३ ते १२ किमी- २० रुपये
  • १२ ते १८ किमी- ३० रुपये
  • १८ ते २४ किमी- ४० रुपये
  • २४ ते ३० किमी- ५० रुपये
  • ३० ते ३६ किमी- ६० रुपये
  • ३६ ते ४२ किमी- ७० रुपये
  • ४२ किमीपेक्षा अधिक- ८० रुपये

 

  • मेट्रो २ ए – यलो लाईन – दहिसर ते डीएन नगर- १८.६ किमी- १७ उन्नत स्थानके
  • मेट्रो ७- रेड लाईन- दहिसर पू. ते अंधेरी पू.- १६.५ किमी- १३ उन्नत स्थानके