गर्डर बसविण्यासाठी स्वयंचलित यंत्र

मुंबई : ‘मेट्रो ६’ मार्गिकेवर गर्डर बसविण्यासाठी आयात करण्यात आलेल्या ‘स्टार्डल कॅरिअर’ या स्वयंचलित यंत्रामुळे वाहतुकीला अडथळा न होता काम सुलभ होईल. या पद्धतीची यंत्रसामग्री देशात प्रथमच वापरली जात असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांगितले. यामुळे एकूण कामाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली.

स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या सुरू असून अनेक ठिकाणी खांबांचे काम झाले असून गर्डर, पिअर कॅप बसविण्याचे काम सुरू आहे. गर्डर वपर्यंत चढविताना मोठय़ा क्रेन्सचा वापर करावा लागतो. तसेच हे काम करताना रस्त्याचा बराचसा भाग व्यापला जात असल्याने वाहतुकीला फटका बसतो; पण स्टार्डल कॅरिअरमुळे रस्त्याच्या अधिक भागाचा वापर न करतादेखील गर्डरचे काम होऊ शकते. मेट्रो ६ च्या या टप्प्याचे काम जे. कुमार इन्फ्रामार्फत सुरू आहे.

सर्वसाधारणपणे स्टार्डल कॅरिअर हे मोठय़ा बंदरांमध्ये कंटेनरच्या हालचालीसाठी वापरले जातात.  देशात याचा वापर प्रथमच केला जात आहे. सध्या अशा प्रकारची दोन यंत्रे वापरली जाणार असून प्रत्येकाची किंमत सुमारे ७.५ कोटी रुपये आहे.

तांत्रिक बाबी

२९.५ मीटर उंच आणि २४ मीटर रुंद असे हे सोळा चाकांवर कार्यरत होणारे यंत्र जास्तीत जास्त १५५ मेट्रिक टन वजन उचलू शकते.

२२ मीटरच्या उंचीपर्यंत ‘यू गर्डर’ उचलण्याची यंत्राची क्षमता. १८० अंशात चलनवलन.