मरीन लाइन्स येथे महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या रेस्टॉरंटच्या एका कर्मचाऱ्याला शनिवारी अटक करण्यात आली. दक्षिण मुंबईतील एका चायनीज हॉटेलमध्ये आरोपी नोकरीला आहे. महिलेसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

बुधवारी सकाळी महिला पारसी डेअरी फार्मच्या विरुद्ध दिशेला बसलेली असताना आरोपी तिच्या जवळ जाऊन बसला. महिला तिच्या फोनवरुन बोलत असताना, आरोपी तिच्याजवळ गेला. नेमकं काय घडतय हे कळण्याआधीच महिलेसमोरच आरोपीने आपल्या पँटची चैन उघडली व आक्षेपार्ह कृती सुरु केली.

त्याचे वर्तन पाहून महिलेने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. महिलेने नंतर एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मरीन लाईन्सला जिथे ही घटना घडली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यावरुन आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर महिलेने त्याला ओळखले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली अशी माहिती एलटी मार्ग पोलिसांनी दिली.

पोलिसांनी हॉटेलच्या मालकाला कर्मचाऱ्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती दिली आहे. त्याला लवकरच हॉटेलमधून काढून टाकण्यात येईल. तक्रारदार महिला परदेशी दूतावासामध्ये नोकरीला आहे.