सातत्याने प्रयोगशील नाटय़निर्मिती, विविध नाटय़प्रशिक्षण आणि अन्य कार्यशाळा आयोजित करून गेली ४५ वर्षे आविष्कार या नाटय़संस्थेने महाराष्ट्रात नाटय़जाणिवा प्रगल्भ करण्यात तसेच नाटकाच्या सर्वागामध्ये नव्या पिढय़ा तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याच परंपरेतील पुढील पाऊल म्हणजे ‘नाटककाराच्या शोधात’ कार्यशाळा होय.
  लेखन ही स्वयंभू प्रक्रिया आहे किंवा लेखक जन्मावाच लागतो, हे जरी खरे असले आणि लेखनच नव्हे तर कुठल्याही कलेबाबत हे म्हणता येत असले तरी प्रशिक्षणाने त्या त्या कलेतील जाण, सखोल दृष्टिकोन आणि तंत्र सुयोग्य पद्धतीने विकसित करता येते हे सिद्ध झाले आहे. याच भूमिकेतून आविष्काराने तरुण नाटककार घडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.‘नाटककाराच्या शोधात’ ही तरुण नाटककार घडविण्याची आणि त्यांच्याकडून नव्या सकस नाटय़संहिता लिहून घेण्याची कार्यशाळा जून ते ऑक्टोबर २०१५ अशी चालणार असून, तिचे एकूण पाच टप्पे आहेत.
मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नेपथ्य- प्रकाशयोजनाकार, दिग्दर्शक प्रदीप मुळये, प्रख्यात नाटककार शफाअत खान व जयंत पवार हे या कार्यशाळेचे संचालक असून या तिघांसह रंगभूमीशी संबंधित इतर तज्ज्ञांची समिती निवडप्रक्रियेत सहभागी असेल. आवश्यकतेनुसार इतर नाटककार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यात मार्गदर्शक म्हणून सहभागी होतील.
अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४४५८७१ (सायं. ६ ते ९),
संकेत स्थळ : http://www.awishkartheatre.com