वर्षभरातील तिसरा हंगाम वाया, निर्मात्यांकडून ऑनलाइन कार्यशाळांचे आयोजन

मुंबई : एप्रिलमध्ये परीक्षा संपवून बालगोपाळ नाटकांच्या तालमींना लागतात आणि मे महिन्यात बालनाटय़ाचा हंगाम सुरू होतो. परंतु करोनामुळे गेला उन्हाळा, दिवाळी आणि पुन्हा उन्हाळा असे तीन हंगाम बालनाटय़ावर पडदा पडला आहे. यावर्षी बालनाटय़ सादर करता येईल, या आशेने बालनाटय़ निर्माते तयारीला लागले होते. परंतु कठोर निर्बंधांमुळे यंदाही बालनाटय़ होऊ न शकल्याने निर्मात्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे.

रंगभूमीला बालनाटय़ाचा अभिजात वारसा आहे. दरवर्षी शालेय सुट्टय़ांमध्ये बालनाटय़े सादर केली जातात. त्यातही दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीतील एप्रिल -मे महिना बालनाटय़ासाठी विशेष मानला जातो. शाळेला सुट्टय़ा लागताच मुलांची शिबिरे, कार्यशाळा घेऊन निर्माते बालनाटय़ सादरीकरणाच्या तयारीला लागतात. परंतु गेल्या वर्षभरापासून या शिरस्त्यात खंड पडत आहे. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी झाल्याने नाटक ठप्प झाले. नंतर शिथिलीकरणात बालनाटय़ाला परवानगी नाकारल्याने दिवाळीचाही हंगामही वाया गेला. आता मे महिन्यात तरी बालनाटय़ सुरू होईल अशी आशा निर्मात्यांना होती. त्यादृष्टीने संहिता, प्राथमिक तयारी, मुलांची निवड, संकल्पनेवर काम अशी मोट निर्मात्यांनी बांधली होती. परंतु पुन्हा करोना वाढीस लागल्याने निर्मात्यांना हे प्रयत्न थांबवावे लागले.

गेल्या सव्वा वर्षांत बालनाटय़ाचे कोणतेही सादरीकरण होऊ शकले नाही. असे बालरंगभूमीच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झाले आहे. यामुळे निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाले. परंतु त्याहून अधिक नुकसान बाल कलाकारांचे झाले आहे. याच माध्यमातून मुलांच्या कलेला वाव मिळतो, व्यासपीठ मिळते. करोनामुळे मुलांना एका सकस माध्यमापासून दूर राहावे लागल्याने घोर निराशा माझ्या मनात आहे, असे बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार यांनी सांगितले.

ऑनलाइन शिबिरे

बालनाटय़ बंद असल्याने यातून वाट काढण्यासाठी काही निर्मात्यांनी ऑनलाइन बालनाटय़ शिबिरे, कार्यशाळा यांचे आयोजन केले आहे. डोंबिवलीतील वेध अकादमी या संस्थेने उन्हाळी सुट्टीचे निमित्त साधून सलग चार कार्यशाळा आयोजित केल्या. विशेष म्हणजे घरात बसून कंटाळलेल्या मुलांना हे व्यासपीठ आवडत आहे. ‘बालनाटय़ाचे तिन्ही हंगाम वाया गेल्याने आमचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु बालनाटय़ थांबले तरी आम्ही काम थांबवलेले नाही. ऑनलाइन कार्यशाळेच्या माध्यमातून बालरंगभूमी चळवळ सुरू ठेवली आहे. संहिता वाचन, विविध खेळ, अभिनय याचे प्रशिक्षण देऊन मुलांचे मनोबल वाढवत आहोत. त्यासाठी नाटकाचा ऑनलाइन अभ्यासक्रमही तयार केला आहे,’ असे माता अनुसया निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण भारदे यांनी सांगितले.