वारकऱ्यांच्या सोयीसाठी यापुढे एकादशीला होणाऱ्या शासकीय महापूजेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एकादशीला होणाऱ्या तिन्ही पूजा आता पाच तासांऐवजी एका तासात आटोपण्यात येणार असल्यामुळे उर्वरित चार तास भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध होणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा मांडताना आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी सरकार काय व्यवस्था केली आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर खडसे यांनी ही माहिती दिली. आजवर आषाढी, कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदीरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत तीन प्रकारच्या पूजा होत होत्या.