डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. स. खांडेकर यांचे जन्मदिनझाले स्मृतिदिन

साहित्यविश्वातील सर्वाधिक जुनी संस्था अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपल्या संकेतस्थळावर काही साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू तारखांच्या नोंदीत घोळ घातला आहे. जन्म-मृत्यू नोंदणीच्या या चुकीच्या तारखांकडे संबंधितांचे लक्ष वेधूनही यात अद्याप सुधारणा करण्यात आलेली नाही.

‘मसाप’कडून वर्षभरात काही साहित्यिकांची जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याची माहिती ‘मसाप’च्या संकेतस्थळावर ‘कार्यक्रम’ या शीर्षकाखाली देण्यात आली आहे. त्यात हा घोळ घालण्यात आला आहे. साहित्यप्रेमी अमेय गुप्ते यांनी संबंधित साहित्यिकांच्या जन्म आणि मृत्यूची नोंदणी असलेले दाखले ‘मसाप’कडे सादर केले आहेत. मात्र तरीही ‘मसाप’ने आपली चूक सुधारलेली नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘स्मृतिदिन’ १४ एप्रिल रोजी असल्याचे ‘मसाप’च्या संकेतस्थळावर दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात ६ डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन/ पुण्यतिथी दिवस आहे. ६ डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो हे सर्वश्रुत आहे. मात्र तरीही १४ एप्रिल हा डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिन ‘मसाप’ने ‘स्मृतिदिन’ केला आहे.

‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या स्मृतिदिनाबाबतही अशीच चूक करण्यात आली आहे. २ सप्टेंबर या दिवशी त्यांचा मृत्यू झाला मात्र ‘मसाप’च्या लेखी ११ जानेवारी या दिवशी खांडेकर यांचा स्मृतिदिन आहे. तशी नोंदही ‘मसाप’ने संकेतस्थळावर केली आहे. वास्तविक ११ जानेवारी हा खांडेकर यांचा ‘जयंती’ दिन आहे. साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन ‘मसाप’च्या संकेतस्थळावर १७ जुलै या दिवशी  दाखविण्यात आला आहे. अण्णा भाऊ साठे यांचा मृत्यू दिन १८ जुलै असा आहे, तर त्यांचा जन्मदिन १ ऑगस्ट असा आहे.

चुकीच्या तारखांची योग्य ती दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. तसेच भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची जयंती (२६ मे) किंवा पुण्यतिथी (२३ जानेवारी) या दिवशी ‘मसाप’ने काही ना काही कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी आपण ‘मसाप’कडे केली असल्याचे अमेय गुप्ते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मसाप’च्या संकेतस्थळावर साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू नोंदणीबाबत अनवधानाने ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त केल्या जातील.   रावसाहेब कसबे,अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद