आम आदमी पक्षातील बंडखोर नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण व अन्य नेत्यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली आहे. केंद्रातील भाजप सरकारला व दिल्लीतील केजरीवाल सरकारला शह देण्यासाठी भ्रष्टाचार, जातीय अत्याचार, शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती स्वराज्य अभियानाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य ललित बाबर यांनी दिली.
दिल्लीतील अभूतपूर्व यशानंतर आपमध्ये नेतृत्वावरून संघर्ष सुरू झाला. आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुरोगामी-धर्मनिरपेक्ष चेहरा असलेल्या योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आदींची  पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे पक्षात दोन गट पडले.
आपशी संबंध संपुष्टात आल्यानंतर, यादव, भूषण यांनी स्वराज्य अभियान नावाने भ्रष्टाचार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्र चळवळ सुरू करण्याचे ठरविले. दलित समाजाला सोबत घेण्यासाठी जातीय अत्याचाराचा प्रश्नही अभियानाच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. योगेंद्र यादव यांनी अलीकडेच राज्याचा दौरा करून प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नव्या पक्ष स्थापनेमागची भूमिका स्पष्ट करून सांगितली.

सध्या स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, शेतकरी, शेतमजूर, भूमाहिनांच्या प्रश्नांवर १० ऑगस्टला संसदेवर एक लाखाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
 -ललित बाबर,
स्वराज्य अभियानाचे सदस्य