घरात हक्काच्या नव्या वस्तू आणण्याआधी आणि आणल्यानंतर महिनाभर शेजारश्रवणाची पुरेशी काळजी घेण्याचा आणि त्या मिरवण्याचा उत्साह ओसरण्याच्या या काळात भाडय़ाने उंची चैनीच्या वस्तू तात्पुरत्या काळासाठी आणण्याचा नवा प्रघात मध्यम आणि उच्च मध्यमवर्गात पडू लागला आहे. केसाच्या पिनांपासून ते सण-समारंभांमध्ये मिरविण्यासाठीचा पेहराव, आभूषणे, शोभेच्या वस्तू, स्वयंपाक घरातील क्रोकरीच्या वस्तू ते अगदी घराच्या रंगाला आणि ढंगाला साजेसे फर्निचर निश्चित कालासाठी भाडय़ाने पुरविणारी बाजारपेठच सज्ज झाली असून, तिची उलाढाल थोडी-थोडकी नव्हे तर चक्क कोटय़वधी रुपयांच्या घरात आहे. याचे कारण म्हणजे, अल्प काळासाठी का होईना, पण आपण आहोत त्या पायरीपेक्षा उच्च आर्थिक वर्गात असल्याचे दाखविण्याकडे मुंबई-पुण्यासह अनेक शहर, उपनगरांमधील तरुण नोकरदारांचा कल वाढत चालला आहे.

नवी वस्तू आणून त्याचे उत्साहात स्वागत करण्याचा, वस्तूची नवलाई वाटण्याचा, घरातील एखादा मोठ्ठा समारंभ समोर ठेवून त्यासाठी कपडेलत्ते खरेदीसाठी पैसे बाजूला काढून ठेवण्याचा काळ आता मागे सरू लागला आहे. एखादी वस्तू आपल्याकडे नसेल किंवा ती विकत घेण्याची ऐपत नसेल तर पूर्वी ती मित्र-मंडळींकडून उसनवारीने घेतली जात असे. आता ही उसनवारी शुल्क आकारून अर्थात भाडेतत्त्वावर केली जात आहे. एका दिवसापासून ते काही महिन्यांच्या कालावधीसाठीही वस्तूंचा वाजवी दरात तात्पुरता मालकी हक्क मिळत असल्यामुळे ग्राहकांना आपल्या खिशानुसार उंची जीवनशैली अनुभवण्याचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. शिक्षण आणि नोकरीनिमित्त सातत्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर करणाऱ्या तरुण नोकरदार मंडळींचा या पर्यायाकडे जास्त ओढा आहे. वस्तू खरेदी करून त्याची कायमस्वरूपी जबाबदारी घेण्यापेक्षा आपल्या पाहिजे त्या कालावधीसाठी पाहिजे ती वस्तू भाडय़ाने घ्यायची आणि वापर झाला की परत द्यायची अशी मानसिकता सध्याच्या तरुणांची झाल्याचे ‘ग्रॅब ऑन रेंट’ या संकेतस्थळाचे संस्थापक शुभम जैन यांनी सांगितले. नोकरीच्या निमित्ताने स्थलांतराचे प्रमाणही वाढले आहे. हे स्थलांतर करताना तरुणांना सामानाची फारशी जबादारी घ्यायची नसते यामुळे ते एखाद्या गावात जेवढय़ा कालावधीसाठी आहेत तेवढय़ा कालावधीसाठी आवश्यक फर्निचर, गृहोपयोगी वस्तू भाडय़ाने घेतल्या जातात. याचे भोडही माफक असल्यामुळे तरुणांना ते परवडणारे वाटत असल्याचेही शुभम यांनी सांगितले. या पर्यायाचा स्वीकार करणाऱ्यांमध्ये २१ ते ३० वयोगटातील ६६ टक्के तरुणांचा समावेश आहे. तर ३१-४० वयोगटातील वर्गही या पर्यायाचा स्वीकार करताना दिसतो. तसेच घरातील फर्निचर सतत बदलत ठेवण्याची आवड असणारी, याचबरोबर उच्च दर्जाच्या जीवनशैलीची आवड असणारी मंडळीही या पर्यायाचा स्वीकार करत असल्याची माहिती शुभम यांनी दिली. अनेकांनी तर आपल्या घरातील जुने फर्निचर विकून भाडय़ाने फर्निचर घेण्यास सुरुवात केल्याची माहितीही त्यांनी दिली.

गृहपयोगी वस्तूंसोबतच दुचाकी तसेच लॅपटॉप, वैद्यकीय विभागात रुग्णांची चाकाची खुर्ची, आरामाची खाट या वस्तूही भाडय़ाने घेतल्या जात असल्याचे निरीक्षण ‘रेंट ऑन गो’ या कंपनीचे संस्थापक निखिल छाब्रा यांनी नोंदविले. सध्या देशात स्थापन होत असलेले नवउद्योग या पर्यायाचा सर्वाधिक स्वीकार करत असल्याचेही ते म्हणाले. तात्पुरत्या कार्यालयासाठी मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा भाडय़ाने फर्निचर आणि लॅपटॉप घेऊन ते आपला व्यवसाय सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-पुण्यासारख्या शहरातून भाडय़ाच्या दुचाकींना मोठी मागणी असल्याचेही ते म्हणाले.

बदलाचे वारे..

वस्तू, कपडे आणि दागिने आपल्या हक्काचे असावेत या धारणेत गेल्या काही वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे. उपग्रह वाहिन्यांमुळे, जागतिकीकरणाच्या कालावधीत फॅशन, उंची राहणीमान यांचा पगडा केवळ शहरांतच नाही तर उपनगरे आणि निमशहरांमधील नागरिकांवरही मोठय़ा प्रमाणावर पडला. पूर्वी लोक खास कार्यक्रम, सण-समारंभ यांच्यासाठी ठेवणीतले कपडे आणि दागिने राखून ठेवायचे.  मात्र बदलत गेलेले कौटुंबिक अर्थकारण, जीवनशैली आणि त्याच्या व्यस्त प्रमाणात जागेची उपलब्धता यातून या संकल्पनाच कायमच्या अडगळीत गेल्या आहेत. बाजारात अल्प काळासाठी या सर्व गोष्टी भाडेतत्त्वावर अत्यंत माफक शुल्कात विविध पर्यायांसह उपलब्ध झाल्या असल्याने, त्यांचा अंगिकार करण्याकडे कल वाढत आहे.

सुंदर मी दिसणार..

मिरवण्याची, समारंभांमध्ये वेगळे दिसण्याची नैसर्गिक हौस पूर्ण करण्यासाठी आता महागडय़ा, ट्रेंडी कपडय़ांच्या खरेदीऐवजी ते भाडय़ाने देणाऱ्या दुकानांकडे सर्वच आर्थिक स्तरातील लोक जात आहेत. ठरावीक मुदतीसाठी मोबदला घेऊन पेहेराव पुरवणाऱ्या दुकानांच्या देशपातळीवर शाखा सुरू झाल्या आहेत. कपडे, त्याला शोभणारे दागिने, पर्स, चप्पल अशा सगळ्या वस्तू भाडेतत्त्वावर मिळतात. सुंदर दिसण्यासाठी कपडय़ांची पूर्ण किंमत मोजण्याऐवजी त्याच्या एक दशांश किंवा पंचमांश रक्कम मोजावी लागत असल्यामुळे ग्राहकांना ते किफायतशीर वाटते. लग्न किंवा समारंभासाठी घेण्यात येणाऱ्या कपडय़ांची किंमत मुळात अधिक असते. मात्र, प्रत्येक समारंभासाठी वेगळे काही हवे असते त्यामुळे विकत घेतलेल्या या कपडय़ांचा वापर पुरेसा होत नाही. त्यांची काळजी घ्यावी लागते आणि ते ठेवण्यासाठी जागाही अडते. या सगळ्याला या व्यवसायाने पर्याय दिला आहे. विशिष्ट प्रसंगांनुरूप उंची कपडे विकत घेण्यासाठी अधिक पैसे मोजण्याऐवजी ते एकदा वापरण्यासाठी तुलनेने अत्यंत कमी खर्च येतो.  महिलांसाठी लेहेंगा, चनिया-चोली, घागरा, पार्टी गाऊन्स अशा कपडय़ांना सध्या मागणी आहे. पुरुषवर्गाकडून शेरवानी, ब्लेझर, मोजडी यांसाठी अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. लग्न आणि सणासुदीच्या काळात कपडय़ांना अधिक मागणी असते. कपडय़ांमध्ये अगदी एक हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. डिसेंबर आणि जानेवारीसाठीची नोंदणी झाली असून आता फेब्रुवारीसाठीची नोंदणीही सुरू झाल्याचे पॉपिन या दुकानाच्या मुलुंड शाखेचे व्यवस्थापक राजेश जोगदंड यांनी सांगितले.

मोसमानुरूप मागणी

या वर्षीच्या उन्हाळय़ामध्ये वातानुकूलन यंत्र, एअर कूलर अशा वस्तूंना मोठय़ा प्रमाणावर मागणी होती. चार महिन्यांसाठी या वस्तू भाडय़ाने घेऊन काम झाले की त्या परत द्यायच्या. नवीन वातानुकूलन यंत्र घेण्यापेक्षा चार महिने भाडय़ाने घेणे आम्हाला परवडत असल्याचे बंगळुर येथील आयटी कंपनीन संगणक अभियंता म्हणून काम करणारा सागर लाड सांगतो. आमच्या घरातील ५० टक्के वस्तू या भाडेतत्त्वावर घेतलेल्या असून त्या वस्तू वापरून कंटाळा आला की आम्ही त्या परत देतो आणि नवीन वस्तू घेतो असेही तो सांगतो. पावसाळय़ात आणि हिवाळय़ात ट्रेकला जाणारी मंडळी साहसी प्रवासासाठी आवश्यक वस्तू भाडय़ाने घेतात. याचबरोबर कॅमेरा किंवा चांगल्या दर्जाच्या कॅमेरा लेन्सही भाडय़ाने उपलब्ध आहेत. लग्न समारंभाच्या निमित्ताने लेझर दिवे आणि संगीत प्रणालीलाही मोठी मागणी असते.

अशी आहे बाजारपेठ

सध्या बाजारात उपलब्ध असलेले विविध वस्तूंचे विक्रेते, उत्पादक तसेच या वस्तू भाडय़ाने देणाऱ्या संस्था यांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देऊन या नवीन सेवेचा जन्म झाला. यासाठी ऑनलाइन कंपन्यांच्या काही नियम व अटी असतात. या अटी पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना या व्यासपीठावर स्थान दिले जाते. ग्राहकाने ऑनलाइन वस्तू निवडून ठरावीक अनामत रक्कम भरली की वस्तू घरपोच दिल्या जातात व परत करतेवेळी तेथून नेल्या जातात. यामुळे ग्राहकाला यामध्ये फारसा त्रास नसतो.

असे आहेत दर वस्तू – दर प्रतिमाह

  • डबल बेड गादी, पांघरुण आणि गालिच्यासह – ८२९ रुपये
  • सोफ्याची खुर्ची, पुस्तकांचे कपाट, टेबल लॅम्प, गालिचा – ९२९ रुपये
  • सोफा सेट, टेबल, गालिचा – १४०९ रुपये
  • लॅपटॉप आणि डेस्कटॉप – १३०० रुपयांपासून पुढे
  • कॅम्पिंग बॅग – १०० रुपये प्रतिदिन – कॅम्पिंग तंबू – ६० रुपये प्रतिदिन