कामावर निघालेल्या २४ वर्षीय तरुणीला निर्जनस्थळी चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी चेंबूरच्या सुमन नगर परिसरात घडली. बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पादचाऱ्यांनी उचलून रुग्णालयात नेले. परंतु, दुपारी तिचा मृत्यू ओढवला. नेहरुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चेंबूरच्या सुमन नगरमधील दत्त नगर येथील साईनाथ चाळमध्ये करिश्मा माने (२४) आईवडिल आणि लहान बहिणीसह राहते. बेताची परिस्थिती असल्याने करिश्मा दादर येथील कपडय़ाच्या दुकानात काम करत होती. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नऊच्या सुमारास कामाला जाण्यास करिश्मा घरातून निघाली. सुमन नगर जंक्शन येथे असलेल्या अण्णाभाऊ साठे उड्डाणपूलाखालून करिश्मा कुर्ला रेल्वेस्थानकाला जाणाऱ्या पायवाटेने जात होती. त्यावेळी लपून बसलेल्या  एका मारेकऱ्याने तिच्यावर मागून चाकूहल्ला केला. पाठीत वार झालेली करिश्मा कोसळली. तुरळक लोकांची रहदारी असलेल्या या पायवाटेला काही पादचाऱ्यांनी जखमी करिश्माला पाहिले आणि त्यांनी जवळच असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी जखमी करिश्माला जवळच्याच सुराणा-सेठीया रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीची दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.