नाताळनिमित्ताने पार्टी करून घरी परतणाऱ्या तरुणीचा मोटारगाडीला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडला. सांताक्रूझला राहणारी लालनथुरी समाथे (२२) ही एका स्पामध्ये काम करते.  बुधवारी नाताळच्या निमित्ताने ती आपल्या मित्रांसह वांद्रे येथील एका पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. तेथे सर्वानी मद्यपानही केले होते. तेथून ते गाडीने पश्चिम द्रुतगती महामार्गावरून घरी परतत होते. प्रदीप शाह (३०) हा गाडी चालवत होता तर लालनथुरी त्याच्या शेजारी बसली होती. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास रामनगर सबवेजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडी एका संरक्षण भिंतीला जाऊन आदळली. या अपघातात लालनथुरी गंभीर जखमी झाली होती. भीतीपोटी चालक प्रदीप शाह घटनास्थळावरून पळून गेला. लालनथुरीला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विलेपार्ले पोलिसांनी चालक प्रदीप शाहला त्याच्या घरातून अटक केली.