17 October 2019

News Flash

गोवंडीत गर्दुल्ल्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

या हल्ल्यात जयेश गुप्ता (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला असून तो उत्तर प्रदेशातील राहणारा आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

पाच जणांवर चाकूने वार

मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात बुधवारी दुपारी गर्दुल्ल्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गर्दुल्ल्याला अटक केली आहे.

या हल्ल्यात जयेश गुप्ता (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला असून तो उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. चार दिवसांपूर्वी हा तरुण चेंबूर येथील आनंद नगर परिसरात त्याचे वडील राहत असलेल्या ठिकाणी आला होता. बुधवारी दुपारी खरेदीनिमित्त तो त्याच्या वडिलांसह गोवंडी शिवाजीनगर परिसरात गेला होता. याच दरम्यान आरोपी अरविंद यादव याने एका महिलेवर चाकूने हल्ला केला. महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या चौघांवरही गर्दुल्ला असलेल्या यादवने  हल्ला केला. त्या चौघांमध्ये जयेश गुप्ताचाही समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जयेशच्या छातीवर वार केल्याने जखमी झालेल्या जयेशला त्यांच्या वडिलांनी खासगी रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याला दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आनंद नगर परिसरातील रहिवाशांनी शताब्दी रुग्णालयाला घेराव घातला. त्यामुळे पोलिसांना रुग्णालयात परिसरात मोठा बंदोबस्त ठेवावा लागला होता.

पोलिसांच्या तावडीतून आरोपी सुटल्याचा आरोप

महिलेवर हल्ला केल्यानंतर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत गाडीत बसवले होते. मात्र आरोपीने पोलिसांना चकवा देत त्यांच्या तावडीतून पळ काढला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य तिघांवर व जयेशवर त्याने हा केल्याचा आरोप जयेशचे वडील राजेश गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या निष्काळजीमुळेच हा बळी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

First Published on October 11, 2019 2:11 am

Web Title: youth killed three others injured in attack by drug addict in govandi zws 70