गेल्या दोन महिन्यांत ३० ते ४० वयोगटातील ५४ हजार जणांना लागण; सर्वाधिक मृत्यू ७० ते ८० वयोगटातील

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या दुसरी लाटेत गेल्या दोन-अडीच महिन्यांत मुंबईतील ३० ते ४० वर्षे वयोगटांतील तरुणवर्ग सर्वाधिक बाधित झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या दोन महिन्यांत ३० ते ४० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ५४ हजारांहून अधिक जण बाधित झाले आहेत. मात्र मृतांचे सर्वाधिक प्रमाण ७० ते ८० वर्षे या  वयोगटात असून या वयोगटातील २७४ रुग्णांचा या दोन महिन्यांत बळी गेला आहे.

फेब्रुवारीत रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत तब्बल अडीच लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले, तर तब्बल साडेनऊशे रुग्ण मृत्युमुखी पडले. मात्र या बाधितांचा आणि वयोगटाचा विचार करता त्या वेळी तरुण पिढी अधिक बाधित झालेली आढळून आली आहे. मात्र मृतांमध्ये ७० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ  नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारीनंतर दैनंदिन रुग्णांची व मृतांची संख्याही वाढू लागली. दर दिवशी साडेअकरा हजारांपर्यंत रुग्णांचे प्रमाण वाढले. मात्र गेल्या आठवडय़ापासून हे प्रमाण कमी होत असून आठ हजारांच्या आत दैनंदिन रुग्णांची संख्या आहे, तर मृतांचे प्रमाण दैनंदिन ५०च्या पुढे गेले होते. मात्र हे प्रमाण सरासरी १३ ते १५ इतके  होते. बाधितांच्या तुलनेत मृत्युदर कमी असून दर दिवशी ०.००३ टक्के इतका दैनंदिन मृत्युदर आहे. दरदिवशी आढळणाऱ्या मृतांमध्ये दोन ते पाच मृत्यू हे ४० वयोगटांपेक्षा कमी वयोगटातील असतात. तर सर्वाधिक मृत्यू हे ६० वर्षांवरील रुग्णांचे असतात, असेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेत मोठय़ा प्रमाणावर तरुण वर्ग असून तो या काळात बाधित होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  तसेच चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर लक्षणे नसलेले रुग्ण आढळून येऊ लागले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.