यादी संकेतस्थळावर ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील औषध दुकानांच्या संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये राज्यातील औषध विक्रेत्यांनी सामील झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देणाऱ्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी २४ तास सेवा पुरविणाऱ्या राज्यातील २३३ औषध दुकानांची यादी आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय काही समस्या उद्भवल्यास १८००२२२३६५ या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.
ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात केंद्र सरकारच्या उपसमितीमार्फत चौकशी सुरू असताना औषध दुकानदारांनी असा संप पुकारणे योग्य नव्हते. या संपात राज्यातील औषध दुकानांनी सामील होऊ नये, असे आवाहन आपण केले आहे. काही औषध विक्रेत्यांनी ते मान्यही केले आहे.
या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. संपाच्या दिवशीही रुग्णांची अजिबात गैरसोय होणार नाही, असेही डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या संपात सहभागी झालेल्या दी रिटेल अॅण्ड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनने बुधवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत आजाद मैदान येथे धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.