नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त भेट
‘कभी कभी मेरे दिल में’, ‘दिखाई दिए यूँ’, ‘मै पल दो पल का शायर हूँ’, ‘दिल चीज क्या है’.. सारख्या लोकप्रिय गाण्यांनी गेली अनेक वर्षे चित्रपट रसिकांवर गारूड करणाऱ्या संगीतकार उमर खय्याम यांनी गुरुवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. खय्याम यांच्या कुटुंबीयांनी छोटेखानी सोहळ्यात साधेपणाने त्यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने खय्याम यांनी १० कोटी रुपये संपत्ती नवोदित गायक-गायिकांसाठी काम करणाऱ्या ट्रस्टला दान केली.
हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. ‘हीर रांझा’ हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. मात्र ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘नूरी’, ‘त्रिशूल’सारख्या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी त्यांना संगीतकार म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यांच्या चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ९० वर्षांच्या या तरुण संगीतकाराने वाढदिवसाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना, ‘जे जे समाजाचे माझ्याकडे आहे ते त्यांना समर्पित करतो’, या अशा शब्दांत आपली भावना व्यक्त करत आपल्या संपत्तीतले १० कोटी रुपये समाजासाठी दान केले. खय्याम यांच्या पत्नीने नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी हे १० कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. खय्याम यांच्या वाढदिवसानिमित्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.