क्रिकेट खेळताना तरणतलावात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या साहिल भंडारे या दहा वर्षीय मुलाचा बुडून अंत झाला. बोरिवलीच्या अजमेरा ग्लोबल शाळेत शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी शाळेच्या सुरक्षारक्षकाला अटक केली.
साहिल भंडारे बोरिवली पश्चिमेच्या विजयनगर शाळेत चौथ्या इयत्तेत शिकतो. शनिवारी तो शाळेच्या आवारात इतर मित्रांसह क्रिकेट खेळत होता. खेळताना त्यांचा चेंडू या तरणतलावात पडला. तो काढण्यासाठी साहिल शाळेच्या भिंतीवर चढला. काठीच्या सहाय्याने चेंडू काढताना तोल जाऊन तो तरणतलावात पडला. त्याच्या मित्रांना ही बाब समजताच त्यांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकाला जाऊन हा प्रकार सांगितला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. साहिलला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी शाळेचा सुरक्षारक्षक अजय पवार (४९) याला अटक केली आहे.