परिवहनमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा
पैशाच्या अपहाराप्रकरणी निलंबित व बडतर्फ करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) ११ हजार ९८४ वाहकांना सहानुभूती म्हणून पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी विधिमंडळात केली.
या संदर्भात दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील २००५ ते २०१५ या कालावधीतील अपहार प्रकरणांची आकडेवारी सांगितली. प्रवाशांना कमी दराची तिकिटे देणे, तिकिटांची अनियमित विक्री, विनाधनी सामानाची वाहतूक करणे, प्रवास भाडे वसूल करून तिकीट न देणे, भाडे न घेणे व तिकीटही न देणे, वाहकाजवळ रक्कम जादा व कमीही सापडणे आणि इतर काही अपहाराची मोठय़ा प्रमाणावर प्रकरणे उघडकीस आली आहेत. २०१०-११ मध्ये ४८ हजार ५५७, २०११-१२ मध्ये ५१ हजार २९६, २०१२-१३ मध्ये ५२ हजार ६५१, २०१३-१४ मध्ये ५८ हजार ७२३ आणि २०१४-१५ मध्ये ५५ हजार ७७४ प्रकरणांची नोंद झाली आहे. २००५ पासून पैशाच्या अपहारप्रकरणी एसटी महामंडळाने बडतर्फ केलेल्या संख्या ११ हजार ९८४ आहे. २८७३ वाहकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. महामंडळाने दिलेल्या शिक्षेच्या निर्णयाला वाहक न्यायालयात आव्हान देतात. अशा न्यायालयीन प्रकरणांचा महामंडळावर मोठा आर्थिक भार पडतो. त्याचबरोबर वाहक व त्यांच्या कुटुंबांवरही त्याचा परिणाम होतो. या सर्व बाबींचा विचार करून, काही अटी व शर्तीच्या अधीन राहून तडजोडीने ही प्रकरणे निकाली काढण्याचे एसटी महामंडळाने ठरविले होते. त्यानुसार निलंबित व बडतर्फ करण्यात आलेल्या ११ हजार ९८४ वाहकांना सहानुभूती म्हणून कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत पुन्हा एसटीच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी दिली.
एसटी बसचालकावर गोवंडीत हल्ला
मुंबई : सिग्नल लागलेला असताना एसटी बस आणि रस्ता दुभाजकातील अरुंद जागेतून स्कूटी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला ओरडल्याने तिच्यासोबत असलेल्या पुरुषाने थेट एसटीचालकावर चाकूने हल्ला करण्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या पंजाबवाडी येथे मंगळवारी दुपारी घडली. हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ट्रॉम्बे पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्य़ात राहणाऱ्या हरिदास सेबूकर मंगळवारी सकाळी स्वारगेटहून बस घेऊन मुंबईकडे येत होते. स्कूटीवरील महिलेला वाहन चालविताना होणाऱ्या प्रमादाबाबत विचारले असता वाद झाला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2016 रोजी प्रकाशित
१२ हजार बडतर्फ एसटी वाहकांना पुन्हा सेवेची संधी
२००५ पासून पैशाच्या अपहारप्रकरणी एसटी महामंडळाने बडतर्फ केलेल्या संख्या ११ हजार ९८४ आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-04-2016 at 04:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 thousand dismissal st employee get job opportunities