scorecardresearch

मुंबईः परिक्षेपूर्वीच विद्यार्थ्याच्या मोबाईलवर बारावीची प्रश्नपत्रिका ; नगर येथून एकाला ताब्यात,गुन्हे शाखेची कारवाई

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा राज्यमंडळाने केला असला तरी आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊणतास विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे.

crime news
(संग्रहित छायाचित्र)

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा राज्यमंडळाने केला असला तरी आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊणतास विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे.बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर येथून एका संशयीताला ताब्यात घेतले. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>“पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू”; काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “दिल्लीचे ‘निरो’ फक्त…”

शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तीन परीक्षार्थींसह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता. दहा वाजून १७ मिनिटांनी त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचे मोबाईल पाहणी करता उघड झाले होते. याप्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे कक्ष ५ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तक्रारीनुसार, ३ मार्चला १२ वी विज्ञान शाखेची गणिताची परिक्षा होती. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी दोन वाजून १० मिनिटे परीक्षा चालल्यानंतर पर्यवेक्षक रॉबीन परेरा यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तर प्रत्रिका स्वीकारल्या. त्यावेळी एका विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडला. त्यांनी हा प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. त्यावेळी व्हॉट्सॲप तपासणीत दहा वाजून १७ मिनिटांनी त्याला एका मित्राने गणिताची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रश्नपत्रिकेची उत्तरेही १० वाजून २० मिनिटांनी मागवण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे पथक याप्रकरणी तपास करत असताना याप्रकरणाचे धागेदोरे नगरपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी नगर येथून एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 15:52 IST
ताज्या बातम्या