मुंबईतील सिमेंटच्या जंगलात तब्बल १९४ प्रजातींचे पक्षी आहेत असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. कावळा, कबुतर, चिमण्या, साळुंक्या अशा पक्ष्यांव्यतिरिक्त केवळ काही वाहिन्यांवरच दिसणारे अनेक पक्षी मुंबईत वास्तव्यास असल्याचे वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पक्षी गणनेच्या अहवालातून आढळून आले आहे.
बोरिवली पूर्वेला असलेल्या निसर्गरम्य अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हे पक्षीवैविध्य असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी करण्यात आल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक एस. डी. सस्ते यांनी दिली.
यापूर्वीचे पक्ष्यांचे सर्वेक्षण मुंबईत १९८०मध्ये झुमायून अब्दूल अली यांनी केले होते. त्यावेळेस संपूर्ण मुंबईत २४१ प्रजाती आढळून आल्या होत्या. यानंतर मुंबईतील पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती कुठेही उपलब्ध नव्हती. यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून एकटय़ा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान्याच्या १३० चौरस किमी परिसरात १९४ प्रजाती आढळून आल्या आहेत. यामध्ये हळदय़ा, तांबट, जंगली कोंबडय़ा, सूर्यपक्षी, मधुकर, घुबड, घार, गरुड, शिकरा या पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. याशिवाय यंदा प्रथमच मुंबईत काश्मीर फ्लायकॅचर हा पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी मूळचा काश्मीरचा असून तो थंडीच्या कालावधीत कन्याकुमारीपर्यंत प्रवास करतो. या प्रवासादरम्यानचे हे त्याचे मुंबईतील वास्तव्य असेल, असा अंदाज असल्याचेही सस्ते यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 149 genus birds in mumbai
First published on: 02-05-2015 at 05:29 IST