कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी साहित्यविषयक कार्यक्रम आयोजिण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या मागील वर्षीच्या आवाहनाला ४५० पैकी अवघ्या १९ महाविद्यालयांनी प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश महाविद्यालयांनी आपल्याला ‘मराठी भाषे’चे वावडे असल्याचेच दाखवून दिले आहे.
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस राज्यभरात ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे जतन आणि प्रसार तरुणांमध्ये व्हावा यासाठी महाविद्यालयांमध्येही हा दिवस साजरा केला जावा यासाठी ‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’ने राज्यातील सर्व विद्यापीठांना त्या संबंधात सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने १८ फेब्रुवारी, २०११ला परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांनी मराठी साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करून मराठी भाषा दिन साजरा करावा, असे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमाचा अहवाल विद्यापीठाच्या ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’ला (बीसीयूडी) सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ४५० महाविद्यालयांपैकी अवघ्या १९ महाविद्यालयांनी या संबंधातील अहवाल विद्यापीठाला सादर केल्याचे ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे (मनविसे) विद्यापीठ उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी विद्यापीठाकडून माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे.
अवघी १९ महाविद्यालये हा दिवस साजरा करीत असतील तर उर्वरित महाविद्यालयांना मराठी भाषेचे वावडे आहे असे समजायचे का? तसेच, दीड वर्षांत महाविद्यालये अहवाल सादर करत नसतील तर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांकडून याचा पाठपुरावा करायला नको का, असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील मराठीभाषक संस्थाचालकांकडून चालविल्या जाणाऱ्या  महाविद्यालयांनीही विद्यापीठाच्या सूचनेला प्रतिसाद दिलेला नाही, हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे उद्यापासून (२७ फेब्रुवारी) या  महाविद्यालयांना आम्ही ‘मनसे’ भाषेत जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.