स्वाइन फ्लू, डेंग्यूसह अन्य पावसाळी आजारांचीही सुरुवात

शैलजा तिवले

मुंबई : मे महिन्यात वादळामुळे आणि जून महिन्यात जोरदार कोसळलेल्या पावसानंतर मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे या दोन महिन्यांत लेप्टोस्पायोरोसिसचा प्रादुर्भाव वाढला असून लेप्टोचे १९ रुग्ण शहरात आढळले आहेत. गेल्या दोन वषा्रंच्या तुलनेत जूनमध्ये लेप्टोची सर्वाधिक रुग्णसंख्या यावर्षी आढळली आहे. याव्यतिरिक्त हिवताप(मलेरिया), डेंग्यू आणि स्वाइन फ्लू या अन्य पावसाळी आजारांनीही जूनमध्ये डोके वर काढले आहे.

गेल्यावर्षी करोना साथीच्या काळात मलेरिया वगळता अन्य पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या फारच कमी होती. यावर्षी मलेरियाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाला असला तरी लेप्टो, स्वाइन फ्लू, डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे.

यावर्षी मेमध्ये झालेल्या तौक्ते वादळाच्या वेळेस मुंबईत तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले गेले. परिणामी लेप्टोस्पायरोसिसचा संसर्गप्रसार होऊन मेमध्ये सहा रुग्ण आढळले. याकाळात ३०७ नागरिकांना मलेरियाची लागण झाली, तर डेंग्यूचे पाच आणि स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला.

जूनच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्या आठ दिवसांतच महिनाभराचा पाऊस पडल्यामुळे पुन्हा शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. या पाण्यातून प्रवास केल्यामुळे जूनमध्ये लेप्टोचा प्रादुर्भाव मेच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढला. जूनमध्ये लेप्टोचे १३ रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण परळ(एफ दक्षिण), चेंबूर(एम पूर्व) आणि भांडुप(एस) विभाग या भागात आहेत. गेल्या दोन वर्षांत जूनमध्ये सर्वाधिक लेप्टोचे रुग्ण याचवर्षी आढळले आहेत. २०१९ आणि २०२० मध्ये जूनमध्ये लेप्टोचे अनुक्रमे पाच आणि एक रुग्ण आढळला होता.

ही काळजी घ्या!

घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात कचरा साचल्यामुळे उंदीर आणि कुत्र्यांचा वावर वाढण्याची शक्यता असून हे लेप्टोचे वाहक आहेत. साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्तींना ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास स्वत:हून उपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचार उशीराने सुरू केल्यास प्रकृती गंभीर होऊन जीवाला धोका निर्माण होण्याचा संभव आहे.

पावसाळी आजारांची लक्षणे, तपासणी  आणि उपचार यासंबंधी माहितीसाठी नागरिकांनी विभागीय नियंत्रण कक्षांना संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

स्वाइन फ्लूसह अन्य आजारांचे वाढते प्रमाण

स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जूनमध्ये वाढला असून यावर्षांत पहिला रुग्ण मेमध्ये आढळला होता. त्यानंतर आता जूनमध्ये सहा रुग्णांचे निदान झाले. पावसाच्या दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसारच्या रुग्णांमध्ये मे महिन्याच्या तुलनेत वाढ झाली असून याचे अनुक्रमे १५ आणि १४९ रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढून १० झाली आहे. स्वाइन फ्लूचे सात रुग्ण आढळले असले तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. रुग्णांचा वेळेत उपचारही दिले गेले आहेत. करोना प्रतिबंधात्मक  उपाययोजना यासाठीही असल्याने यांचे पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

लेप्टो नियंत्रणासाठी..

लेप्टोस्पायरोसिस नियंत्रणासाठी पालिकेने शहरात पाणी साचलेल्या भागात दोन वेळा २६,०१,३०२ घरांचे सर्वेक्षण करून ८३,२२४ नागरिकांना लेप्टो प्रतिबंधात्मक औषधे दिली आहेत. तसेच पाणी साचलेल्याची शक्यता असणाऱ्या शहरातील ३१८ ठिकाणी १४,२३९ उंदराची बिळे नष्ट केली आहेत.

मलेरियाचा उद्रेक काही भागांत

मलेरियाचा उद्रेक शहरातील काही भागांमध्ये आढळला असून नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना केलेल्या आहेत. यात भायखळा, प्रभादेवी, डोंगरी, परळ या भागांमध्ये अधिक रुग्ण आढळले आहेत. मे महिन्यात मलेरियाचे ३०७ जर जूनमध्ये २७९ रुग्ण आढळले आहेत.