‘अ‍ॅसोचॅम’चे विश्लेषण
१ जानेवारी ते १५ डिसेंबर २०१२ च्या कालावधीत देशभरात विविध आर्थिक क्षेत्रांत नोकऱ्यांच्या निर्मितीत सुमारे २१ टक्क्य़ांनी घट झाली आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाने (अ‍ॅसोचॅम) या संबंधात केलेल्या विश्लेषणात ही माहिती उघड झाली आहे.
१ जानेवारी ते १५ डिसेंबर २०१२ या कालावधीत विविध क्षेत्रांत एकूण ५.३ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या. यापैकी पहिल्या सहामाहीत (१ जानेवारी ते ३० जून दरम्यान) २.८ लाख तर उर्वरित काळात (१ जुलै ते १५ डिसेंबर दरम्यान) २.४ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या. ‘अ‍ॅसोचॅम’ने ‘जॉब ट्रेण्ड्स अ‍ॅक्रॉस इंडिया इन २०१२’ नामक अहवाल तयार केला. अलीकडेच हा अहवाल अ‍ॅसोचॅम’च्या मंडळातर्फे प्रसृत करण्यात आला. देशभरात इतर सर्व आर्थिक क्षेत्रांच्या तुलनेत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने १ जानेवारी ते १५ डिसेंबर २०१२ च्या कालावधीत २.१ लाख इतके सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून पहिला क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक क्षेत्राने या कालावधीत नोकऱ्यांच्या निर्मितीत दुसरा क्रमांक पटकावताना ३४ हजार ५०० तर विमा आणि बँकिंग क्षेत्राने अनुक्रमे २७ हजार १०० व २४ हजार ५०० इतक्या नोकऱ्या उपलब्ध केल्या. ‘अ‍ॅसोचॅम’ रिसर्च ब्यूरोने यासंबंधीचा अहवाल तयार करताना सुमारे चार हजार कंपन्यांतील नोकऱ्यांच्या उपलब्धतेची दैनंदिन स्तरावर दखल घेतली. टाइम्स जॉब.कॉम, नोकरी.कॉम, मोनस्टर.कॉम, शाइन.कॉम त्याचप्रमाणे ५६ शहरांतून प्रसिद्ध होणाऱ्या राष्ट्रीय तसेच स्थानीय वृत्तपत्रांतील ३२ क्षेत्रांतील नोकऱ्यांविषयीच्या जाहिरातींचाही आढावा घेतला आहे.
संबंधित कालावधीत दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये सर्वाधिक १.१ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. त्याखालोखाल मुंबईत ७७ हजार, बंगळुरूत ७५ हजार, चेन्नईत ४४ हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या. पाच मोठय़ा महानगरांमध्ये सर्वाधिक कमी इतक्या २५ हजार नोकऱ्या कोलकाता येथे उपलब्ध झाल्या, असे ‘अ‍ॅसोचॅम’चे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी यासंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांकडे उघड करताना सांगितले.