महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जाणाऱ्या व्यवस्थेमध्ये प्रसूतीदरम्यान वेळेत उपचार न मिळाल्याने मुंबईसारख्या शहरामध्ये गेल्या वर्षभरात २२४ गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे २२४ मृत महिलापैकी १२१ महिला या मुंबईतीलच रहिवासी होत्या.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत येणारी प्रसूतीगृह, रूग्णालये या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची नोंद केली जाते. त्यानुसार गेल्या वर्षभरामध्ये १ लाख ७८ हजार  महिलांची प्रसूती झाली आहे. परंतू यापैकी २२४ महिलांना आपला जीव गमवाव लागला आहे. कारण कित्येकदा वेळेत रूग्णवाहिका न मिळणे, रस्त्यावरील खड्डे, वाहतूकीची कोंडी, सरकारी रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध न होणे, अतिदक्षता विभागात खाटा उपलब्ध नसने आणि महत्वाचे म्हणजे पूर्व उपनगरामध्ये तर अद्ययावत यंत्रणा असणारी रूग्णालयेच नाहीत.
ही वस्तूस्थिती असली तरी प्रवासादरम्यान ११६ महिलांचा, तर प्रसूतीच्या वेळी उशीर झाल्याने  ६९ महिलांचा आणि वेळेवर उपचार करण्यास यंत्रणा कमी पडल्याने २२ महिलांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
परंतु महिलांच्या या मृत्यूबाबत आलेल्या अहवालावर पालिका गंभीर असून हा प्रश्व कशा पध्दतीने सोडविता येईल या संबधी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली असून येत्या काही दिवसात त्यासंबधीचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.