अपघात रोखण्यासाठी वाणिज्यिकवाहनांच्या तपासणीत सुसूत्रता

मुंबई : वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता यावी यासाठी राज्यात ११ अद्ययावत स्वयंचलित वाहन तपासणी व निरीक्षण केंद्रे उभे करण्याचा निर्णय घेतला होता. यात आता आणखी १३ केंद्रांची भर पडली आहे. केंद्र उभारणी आणि त्याच्या नियोजनासाठी लवकरच परिवहन विभागाकडून बैठकही आयोजित के ली जाणार आहे.

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यासह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची आरटीओत तपासणी होते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करताना, त्यानंतर दुसरी तपासणी दोन वर्षांनी आणि मग दरवर्षी तपासणी केली जाते. वाहनांचे सस्पेन्शन, चाक, वेग, वाहनांचे ब्रेक, होणारे प्रदूषण, दिवे इत्यादी तपासणी यात केली जाते. मात्र मानवी पद्धतीने होणाऱ्या तपासणीत बराच वेळ जात असल्याने तपासणीत सुसूत्रताही येत नाही. काही तपासण्या वगळूनदेखील वाहनांना वाहन योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या या वाहनांमुळे अपघाताचा धोकाही संभवतो. यात सुसूत्रता यावी यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी व निरीक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

नाशिकमध्ये पहिले केंद्र

२४ वाहन तपासणी व निरीक्षण केंद्र उभारण्यात येणार असतानाच परिवहन विभागाने याआधी प्रथम ऑक्टोबर २०१५ मध्ये नाशिकमधील पंचवटी परिसरात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारले. यातून महिन्याला मोठ्या संख्येने वाहने तपासणी जातात.

या शहरांत सेवा

मुंबईतील ताडदेव, कु र्ला नेहरू नगर, अंधेरी, ठाण्यातील मर्फी, कल्याणधील नांदिवली, पनवेलमधील तळोजा, नागपूरमधील हिंगणा, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, पुण्यातील दिवे घाट, तर कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सातारा, बारामती, सोलापूर, श्रीरामपूर, लातूर, आंबेजोगाई, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, नागपूर ग्रामीण.