जिल्हा नियोजन मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत आगामी आर्थिक वर्षांसाठी ठाणे जिल्ह्याचा वार्षिक नियोजन कृति आराखडा मंजूर करण्यात आला. त्यानुसार २०१४- १५ साठी जिल्ह्य़ात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी २४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३९ कोटी १६ लाख रूपये जास्त उपलब्ध झाले आहेत. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. जिल्हा नियोजन सदस्यांना आधी जिल्ह्य़ाची इत्थंभूत माहिती द्यावी, तालुकावार समस्यांचा आढावा घेण्यात यावा, अशी सूचना सदस्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी अध्यक्ष तसेच सचिवांना दिलेल्या निवेदनात यावेळी केली. जिल्ह्यातील आरोग्य सेवांविषयीची वस्तुस्थितीही त्यांनी त्यात मांडली आहे.