विशाल प्रकल्प प्रोत्साहन योजनेंतर्गत नाशिक येथील महिंद्रा अ‍ॅंड माहिंद्रा कंपनीला नाशिक महानगरपालिकेने आकारलेली तब्बल २६ कोटी ७५ लाख रुपये जकात माफ करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे.
राज्यात उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, त्यातून राज्याच्या उत्पन्नात भर पडावी, तसेच रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य सरकारने उद्योगांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. विशाल प्रकल्पांसाठी प्रोत्साहनात्मक सवलतीच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात जकात व अन्य कर सवलतीचा समावेश आहे.
महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा कंपनीने २००६ मध्ये विशाल प्रकल्प योजनेअंतर्गत नाशिक येथे विस्तारीत कारखान्याचा राज्य सरकारबरोबर करार केला होता. प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाल्यानंतर कंपनीला भांडवली यंत्रसामग्रीवर व कच्च्या मालावर नाशिक महानगरपालिकेला जकातीपोटी २६ कोटी ७५ लाख रुपये येवढी रक्कम भरावी लागली होती. उद्योग विभागाने विशाल प्रकल्प प्रोत्साहन योजनेंतर्गत ही संर्पूण जकात माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे आर्थिक तरतूद करण्यात आली होती.