दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांची माहिती
केंद्र सरकारकडून भारतात आयसिसचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलली जात असतानाच मुंबईतील मालवणी येथील तीन तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अयाज सुलतान(२३), मोहसीन शेख(२६) आणि वाजिद शेख(२५) अशी या तरुणांची नावे असल्याचे मालवणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कुवेत येथील एका खासगी कंपनीने आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी देऊ केल्याचे घरी सांगून ३० ऑक्टोबरला अय्याज या तेवीस वर्षीय तरुणाने घर सोडले. त्याचप्रमाणे मालवणी परिसरात राहणाऱ्या मोहसीन याने मित्राच्या लग्नाला तर वाजिद याने आधार कार्डमधील दुरुस्तीचे कारण सांगून १६ डिसेंबरला घर सोडले. यानंतर एकमेकांना संपर्क साधून हे तिघे जण एका ठिकाणी भेटले. त्यानंतर तिघांनीही कुटुंबियांशी संपर्क साधला नाही. हे तिघे आयसिसला संपर्क करुन संघटनेत सहभागी झाल्याची शक्यता मालवणी पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी वर्तवली.
सध्या मालवणी पोलिसांनी या तिघांच्या ई-मेलचा पासवर्ड तोडण्यास सायबर तज्ज्ञाची मदत घेत आहेत. यात तिघांच्या कुटुंबीयांच्या चौकशी केली जात आहे. हे तिन्ही तरुण कट्टरपंथी असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान इंटरनेटच्या माध्यमातून कुणी त्यांचे मतपरिवर्तन केले का याचाही तपास पोलीस घेत आहेत.
तर दुसरीकडे या तिघांपकी अय्याजने देश सोडल्याची शक्यताही दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केली. मात्र वाजिद आणि मोहसीन यांच्याविषयी कोणतीही माहिती अद्याप मिळाली नसल्याचे समोर आले आहे. वाजिद हा पदवीधर असून गेल्या दहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला आहे. त्याचे कुटुंबीय लिंबाचे घाऊक व्यापारी असून या व्यवसायात तो हातभार लावत असे. तर मोहसीन हा मुंबईत रिक्षा चालवत असे. गेल्या काही महिन्यांपासून हे तिघेही पशांची बचत करत होते आणि देशाबाहेर जाण्यासाठी त्यांनी एका ट्रॅव्हल एजंटशीही संपर्क केला होता, अशीही माहिती मिळाली असल्याचे समोर येत आहे.