मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे ना.म.जोशी मार्ग चाळ पुनर्विकास प्रकल्पातही एका घरामागे एक पार्किंग द्यावी अशी मागणी मागील कित्येक महिन्यांपासून ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी केली आहे. मात्र या मागणीबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने रहिवासी नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर आता मागणीबाबत मतदानाच्या आधी ठोस आश्वासन मिळाले नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी दिला आहे.

ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून केला जात आहे. ना. म. जोशी मार्ग चाळीचा पुनर्विकास सर्वात आधी सुरु होऊनही हा पुनर्विकास संथ गतीने सुरु आहे. ना.म.जोशी मार्ग चाळीनंतर सुरु झालेल्या वरळी आणि नायगावच्या प्रकल्पाने वेग घेतला आहे असे म्हणत ना.म.जोशी मार्ग येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत म्हाडा अधिकाऱ्यांनी नुकतीच एक संयुक्त बैठक घेतली आणि प्रकल्पाला वेग देण्यात येईल तसेच एप्रिल २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून १२६० घरांचा ताबा देऊ असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर समाधान झाल्याचे रहिवाशांकडूनच सांगितले गेले. पण आता मात्र रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : पूनम महाजन यांच्याऐवजी अ‍ॅड. उज्ज्वल निकम, उत्तर मध्य मुंबईत भाजपकडून उमेदवारी

राज्य सरकारने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी एका घरामागे एक पार्किंग देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तेथील पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. असे असताना हा निर्णय ना.म.जोशी मार्ग आणि नायगावसाठी मात्र लागू करण्यात आलेला नाही. तेव्हा यावर आक्षेप घेत ना. म.जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीनेही हा निर्णय लागू करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी याबाबत मतदानाच्या काही दिवस आधी ठोस आश्वासन द्यावे, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. ना.म.जोशी मार्ग चाळीत अंदाजे २५०० घरे आहेत. तेव्हा मतदानावर बहिष्कार घातला तर किमान आठ हजार मतदार मतदान न करण्याची शक्यता आहे. आता या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काही निर्णय घेते का याकडे रहिवाशांचे लक्ष लागेल आहे.

Story img Loader