भिवंडी महापालिकेच्या पद्मानगर येथील तेलगू माध्यमाच्या शाळा इमारतीतील छताचे प्लॅस्टर कोसळून ३१ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंेगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
जखमींपैकी हेसुरम विनय, घिरी अशय, मनोज चेऱ्याला, सुकन्या मदिराला, विनीत भेटी, सुवर्णा कुद्रापू हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी येथील इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले.
पद्मानगर विभागातील महापालिका प्रभाग समिती कार्यालयात उर्दू माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या ८० विद्यार्थ्यांचा वर्ग भरतो. विशेष म्हणजे सोमवारी प्लॅस्टर कोसळण्याच्या भीतीमुळे हा वर्ग लवकर सोडण्यात येऊन महापालिका प्रशासनास याविषयी कल्पना देण्यात आली होती.
तरीही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे. मात्र या घटनेविषयी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे प्रभाग समिती अधिकारी विष्णू तळपदे यांनी सांगितले.