पोलिसांनी शहर सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३२ टक्के मुंबईकरांना शहर असुरक्षित वाटतय. सोनसाखळी चोरी, बलात्कार आदींसह अनेक गंभीर गुन्ह्यात वाढ झाल्याचा निष्कर्ष प्रजाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात मांडला आहे.
 प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मुंबईतल्या गुन्हेगारीबद्दल ही श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली. या अहवालानुसार २०१३ ते २०१४ या मागील आर्थिक वर्षांत मुंबईत हत्या, बलात्कार, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोनसाखळी चोरीच्या २ हजार ११० घटना घडल्या असून त्यात ६६ टक्के वाढ झाली आहे. बलात्काराची ४३२ प्रकरणे नोंदवील गेली असून त्यात ४७ टक्के वाढ झाली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यातही ५२ टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत प्रजाने मुंबईकरांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी विविध स्तरातील २२ हजार मुंबईकरांमध्ये सव्‍‌र्हेक्षण केले. त्यानुसार ३२ टक्के मुंबईकरांना शहर सुरक्षित वाटत नसल्याचे सांगितले आहे. ३६ टक्के मुंबईकरांनी शहरातच प्रवास करणे धोकादायक वाटत असल्याचे म्हटले आहे.
 एकीकडे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असले तरी न्यायालयात दोष सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे ८ टक्के असल्याचे प्रजाने म्हटले आहे. न्यायालयात एकूण २ लाख १ हजार ६६७ प्रकरणे गेली. त्यापैकी १७ हजार प्रकरणांचा निकाल लागून अवघ्या ८ टक्के प्रकरणात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. पोलीस तपासातील दिरंगाईबद्दलही प्रजाने अनेक बाबी समोर आणल्या आहेत. प्रजाने मागील वर्षांची आकडेवारी सादर केली असली तरी बालगुन्हेगारी, दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांबद्दल काहीच उल्लेख केलेला नाही. काही हजार मुंबईकर शहराची सुरक्षितता कशी ठरवू शकतात,असा सवाल मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 percent people living in mumbai feel insecured
First published on: 26-11-2014 at 03:54 IST