मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांना व संबंधित कामांच्या नियोजनाला वेग आला असून गेल्यावर्षीपेक्षा ४० दिवस आधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. मिठी व वाकोला यांसारख्या संवेदनशील नाल्यांपासून या सफाईची सुरुवात झाल्याचे या वेळी महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
यंदा मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईची प्रक्रिया लवकर सुरू केली आहे. गेल्यावर्षी ही प्रक्रिया २४ एप्रिलला सुरू झाली होती, यावर्षी मात्र १४ मार्चपासूनच या प्रक्रियेला सुरुवात झाली. यात मोठय़ा ३३ नाल्यांच्या सफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी सात ठिकाणी कार्यादेश देण्यात आले आहेत. कार्यादेश देण्यात आलेल्या ठिकाणी नालेसफाईला सुरुवात झाली असून उर्वरित १६ कामांचा कार्यादेश देण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, तर १० मोठय़ा नाल्यांबाबत ‘सी पॅकेट्स’ उघडण्यात येणार आहेत. तसेच लहान नाल्यांच्या बाबतीत सफाईची कामे विभाग स्तरावर सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागांच्या साहाय्यक आयुक्तांना यापूर्वीच दिल्याचेही महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या वर्षी नालेसफाईची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नाल्यातील गाळाची वाहतूक ही गाळाच्या प्रत्यक्ष वजनावर आधारित असून सदर वजन संगणकीकृत वजन काटय़ावर केले जाणार आहे. तसेच या गाळाची वाहतूक करणाऱ्या डंपर्सचा मागोवा घेण्यासाठीची व्हीटीएस यंत्रणा यावर्षी महापालिकेच्या सव्‍‌र्हरला जोडण्यात आली आहे. प्रत्यक्ष नाल्यावर डंपर भरण्यापासून ते डंपर वजन काटय़ावर पोहचला हे पाहण्याची जबाबदारी ही पर्जन्य जलवाहिन्या या खात्याच्या कर्मचाऱ्यांची असून वजन काटय़ावरून निघालेला डंपर पूर्व निर्धारित खासगी क्षेपणभूमीवर पोहचल्यावर तेथून पुढील जबाबदारी दक्षता खात्यातील अभियंत्यांची असणार आहे. लहान नाल्यांची सफाई विभाग स्तरावरून व स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांमार्फत सुरू करण्याचे आदेश यापूर्वीच संबंधितांना देण्यात आल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले.