केंद्र शासनाच्या राजीव गांधी आवास योजनेत घर मिळवून देते, अशी बतावणी करीत भारतीय नागरिक दारिद्रय़ निर्मूलन संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून कोटय़वधी रुपये उकळणाऱ्या महिलेला गुरुवारी ठाण्यात अटक करण्यात आली. सरस्वती बिडकर असे या महिलेचे नाव असून, तिला गुरुवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कापुरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ठाणे शहरात राजीव गांधी आवास योजना कार्यान्वित झालेली नाही, असे असतानाही माहिती अधिकाराद्वारे या योजनेची माहिती मिळवून ती नागरिकांची फसवणूक करत होती. आतापर्यंत तिने ५५०० नागरिकांना गंडा घालून सुमारे पाच कोटी रुपये ‘माया’ जमविली असल्याची प्राथमिक माहिती कारवाईदरम्यान उघड झाली आहे.
ठाण्यातील भामटय़ा महिलेला अटक
घोटाळा कसा?
सरस्वती बिडकर हिने कोलशेत परिसरात भारतीय नागरिक दारिद्रय़ निर्मूलन संस्थेचे कार्यालय थाटले होते. केंद्र शासनाच्या राजीव गांधी आवास योजनेत घरे मिळवून देते, असे सांगून सरस्वती नागरिकांकडून अकराशे रुपये गोळा करत होती. त्यासाठी ती संस्थेची रीतसर पावती नागरिकांना देत होती. मात्र त्यावर ‘सदस्यता फी पावती’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. या संदर्भात एका दक्ष नागरिकाने सभागृह नेते नरेश म्हस्के यांना माहिती दिली. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांच्या पथकाने कोलशेत परिसरात धाड टाकली. त्या वेळी पैसे भरण्यासाठी नागरिकांच्या अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पथकास दिसले. त्यात काही पोलीसही पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच माहितीच्या अधिकारात तिने या योजनेसंबंधी माहिती गोळा करून त्याचे फलक आणि पत्रक कार्यालयात लावले होते.
कारवाई कशी?
मुळात ठाणे शहरात राजीव गांधी आवास योजना कार्यान्वित झालेली नाही. असे असतानाही गेल्या वर्षभरापासून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे गोळा करून त्यांना गंडा घालत असल्याचे निदर्शनास येताच पथकाने कारवाई केली आणि तिला कापुरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या संदर्भात महापालिकेने दिलेल्या तक्रारीवरून कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वी बीएसयूपीच्या घरे देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.